नवी दिल्ली : ईशान्येकडील त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमध्ये 2023 च्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत येथे आलेल्या निकालानुसार त्रिपुरा आणि नागालँडमधील सरकारचे चित्र स्पष्ट होत आहे. त्रिपुरामध्ये भाजप पूर्ण बहुमताने दुसऱ्यांदा सरकार स्थापन करत आहे, तर नागालँडमध्ये एनपीपीसोबत आघाडी करून पुन्हा सत्तेत येऊ शकते. तर मेघालयात सध्या त्रिशंकू सरकारची स्थिती निर्माण होत आहे.
निवडणूक निकालांसह काही महत्वाचे अपडेट्स जाणून घ्या...
- मेघालयमध्ये त्रिशंकू स्थिती आहे, म्हणजेच कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी पूर्ण बहुमत मिळालेले नाही. अशा परिस्थितीत मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बोलून सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा मागितला आहे.
- निकालाचा कल समोर येताच मेघालयातील सरकार स्थापनेबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी मेघालय भाजप युनिटला सांगितले की, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मेघालयमधील नवीन सरकारसाठी एनपीपीला पाठिंबा देण्याचे बोलले आहे.
- मेघालयमध्ये मुख्यमंत्री कॉनराड संगमा वेस्ट गोरा हिल्समधील दक्षिण तुरा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. तर नागालँडमध्ये नेफ्यू रिओ कोहिमामधील उत्तर अंगामी जागेवरून विजयी झाले आहेत.
- मेघालय भाजपचे अध्यक्ष अर्नेस्ट मौरी यांनी मेघालयमध्ये भाजप दुहेरी आकडा पार करणार असल्याचा मोठा दावा केला आहे. हे प्रथमच घडत आहे. येथे भाजपला बहुमत मिळू शकले नाही, पण सरकार स्थापन करण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावू शकते.
- त्रिपुरामध्ये भाजपने आतापर्यंत 18 जागा जिंकल्या असून, 15 जागांवर आघाडीवर आहे. सीपीआयएम 2 जागा जिंकून 9 जागांवर तर काँग्रेस 3 जागांवर पुढे आहे. टिपरा मोथा पार्टी 8 जागांवर विजयी झाली असून 4 जागांवर आघाडीवर आहे.
- त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा टाउन बारडोवली मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्रिपुरामध्ये ते राज्याचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार होते. त्यांचा चेहऱ्यावर भाजपने ही निवडणूक लढवली होती.
- त्रिपुरा आणि नागालँडमध्ये भाजपच्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आणि दोन्ही राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत. स्थिरता आणि प्रगतीसाठी हे मतदान आहे. भाजप भविष्यातही काम करत राहील. दोन्ही राज्यातील भाजप कार्यकर्त्यांचेही आभार, त्यांनी परिश्रम घेतले. त्यांचा आम्हाला अभिमान आहे, असे ते म्हणाले.
- नागालँडमध्ये रिपब्लिकन पक्षाचे 2 उमेदवार विजयी झाले आहेत. अजून लोकांच्या विजयाची वाट पाहत असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले. सर्वजण एनडीएला पाठिंबा देतील.
- एनडीपीपीच्या उमेदवार हेकानी जखालू या नागालँड विधानसभेवर निवडून येत पहिल्या महिला बनून इतिहास रचला. नागालँडच्या हेकानी जखालू यांनी दिमापूर-3 मतदार संघातून विजय मिळवला आहे. त्या नागालँडच्या पहिल्या महिला आमदार ठरल्या आहेत. 1963 मध्ये या राज्याची निर्मिती झाली, मात्र आजपर्यंत एकही महिला प्रतिनिधी येथून निवडणूक जिंकू शकली नाही.