रांची : झारखंडमधील जनता सुशासन आणि राजकीय स्थैर्याच्या बाजूने कौल देईल आणि स्पष्ट बहुमताने भाजप झारखंडमध्ये सरकार स्थापन करील, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव प्रताप रुडी यांनी व्यक्त केला.
केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकार मिळून राजकीय अस्थिरता अनुभवलेल्या झारखंडचा सर्वांगीण विकास होईल. या राज्याच्या विकासासाठी भाजपकडे दृष्टिकोन आहे. केंद्र आणि राज्यात सारखेच सरकार असेल, तर विकास करणे अधिक सुलभ होते, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
रघुवर दास यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या यशस्वी कामगिरीचा हवाला देत रुडी म्हणाले की, भाजपने आदिवासी समुदायाच्या विकासासाठी, पायाभूत सोयी-सुविधांच्या विकासासाठी आणि कृषी क्षेत्राच्या वृद्धीसाठी काम केले. झारखंडला राज्याचा दर्जा देण्याचा प्रस्ताव संसदेत मांडण्यात आला, तेव्हा मीसुद्धा या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले होते. स्वतंत्र राज्यनिर्मितीनंतर मात्र दुर्दैवाने अनेक वर्षे या राज्यात राजकीय स्थिरता नव्हती.
मधू कोडा यांच्या २००६ ते २००८ या कार्यकाळाचा संदर्भ देत रुडी म्हणाले की, तत्त्वहीन पक्षाची व्यक्ती मुख्यमंत्री झाल्याचे राज्याने पाहिले. मागची पाच वर्षे भाजपने स्थिर सरकार दिले. यावेळीही झारखंडची जनता सुशासन आणि राजकीय स्थैर्याच्या बाजूने कौल देईल आणि स्पष्ट बहुमताने भाजप झारखंडमध्ये सरकार स्थापन करील. अन्य राजकीय पक्षांच्या तुलनेत भाजप तत्त्व आणि धोरणानुसार काम करते, असेही ते म्हणाले.