भुवनेश्वर - लोकसभा निवडणुकीबाबत विविध वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्ध केलेल्या एक्झिट पोलनंतर भाजपा आणि भाजपाच्या नेतृत्वाखालीली एनडीएच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. तर विरोधी पक्ष संभाव्य जागांच्या आकडेमोडीत गुंतले आहेत. दरम्यान, एक्झिट पोलच्या अंदाजांनंतर एनडीएच्या विस्ताराची प्रक्रिया सुरू झाली आहे. एकेकाळी भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या बिजू जनता दलाने निकालांनंतर एनडीएसोबत येण्याचे संकेत दिले आहे. जो पक्ष ओदिशाला विशेष राज्याचा दर्जा देईल, त्यापक्षासोबत आम्ही जाऊ, असे बीजू जनता दलाकडून सांगण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी ओदिशामध्ये आलेल्या फोनी चक्रीवादळावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाहणी दौरा केला होता. त्यावेळी नवीन पटनाईक यांच्यासोबत मोदींनी वादळाने प्रभावीत झालेल्या भागाची पाहणी केली होती. तसेच नवीन पटनाईक यांच्याविरोधातील टीकाही कमी केली होती. त्याबरोबरच मोदींनी पश्चिम बंगालच्या मुखमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करताना वादळामुळे प्रभावित झालेल्यांसाठी नवीन पटनाईक यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले होते. तेव्हापासूनच एनडीएचे बहुमत हुकल्यास बिजू जनता दल भाजपाला पाठिंबा देऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात होती. दरम्यान, जी आघाडी आमच्या समस्या समजून घेईल, योग्य मागण्या पूर्ण करेल त्या आघाडीला आम्ही पाठिंबा देऊ. जर एनडीए सरकार स्थापन झाले तर त्यांनाही आम्ही पाठिंबा देऊ, असे बिजू जनता दलाचे वरिष्ठ प्रवक्ते अमर पटनाईक यांनी म्हटले आहे. तसेच जी आघाडी केंद्रात सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत असेल, त्यांनाच आम्ही पाठिंबा देऊ, असेही अमर पटनाईक यांनी स्पष्ट केले.
निकालानंतर एनडीए विस्तारणार; भाजपाला जुन्या मित्रपक्षाची साथ मिळणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 10:20 AM