बंगळुरू : जनता दल (एस) आणि काँग्रेसच्या अपात्र आमदारांची इच्छा असल्यास त्यांना भाजप पोटनिवडणुकीसाठी तिकिटे देईल, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांनी सोमवारी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यानंतर पक्षातील काही गटांतून विरोध सुरू झाला आहे. येदियुरप्पा म्हणाले की, पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी माजी आमदारांना तिकिटे देणे ही आमची जबाबदारी असल्याचे सांगितले आहे.गेल्या जुलै महिन्यात काँग्रेस-जनता दल (एस) सरकारमध्ये बंडखोरी झाली, सरकार पडले व भाजप पुन्हा सत्तेवर येण्याचा मार्ग मोकळा झाला. अपात्र ठरवल्या गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघांत येत्या डिसेंबरमध्ये पोटनिवडणुका होणार आहेत. २०१८ मध्ये राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पराभूत झालेल्यांची तसेच आता इच्छुक असलेल्यांची समजूत राज्याच्या मंडळांत किंवा महामंडळांत तुमच्यासाठी ‘संधी’ निर्माण केली जाईल, असे सांगून काढण्याचा प्रयत्न येदियुरप्पा यांनी केला आहे. १५ जागांच्या पोटनिवडणुकांसाठी तारखा जाहीर झाल्या असून, येदियुरप्पा यांनी शिकारीपुरा (जिल्हा शिमोगा) येथे वार्ताहरांशी बोलताना सांगितले की, अमित शहा यांनी ज्यांनी राजीनामे दिले आणि ज्यांना भाजपकडून लढायची इच्छा आहे अशा सगळ्यांना तिकिटे दिली जातील. ती आमची जबाबदारी आहे, असे सांगितले. अपात्र आमदारांना तिकिटे देण्यास पक्षातून काही जणांच्या होत असलेल्या विरोधावर येदियुरप्पा यांनी याबाबत कोणताही संभ्रम व्हायची गरज नाही, असे स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)काय म्हणाले, मुख्यमंत्री येदियुरप्पा?येदियुरप्पा म्हणाले, ‘आमच्या पक्षाकडून लढण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्हाला उमेदवार बनवणे याला आमचे प्राधान्य असेल. भाजपचे कार्यकर्ते आणि नेते तुमच्या विजयाची जबाबदारी घेतील.’गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत होसाकोटे, हिरेकेरूर, कागवाद आणि महालक्ष्मी लेआऊट मतदारसंघात पराभूत झालेल्या भाजपच्या इच्छुक आणि उमेदवारांनी भाजपची उभारणी करण्याचे काम केलेल्या पक्ष कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली गेली पाहिजे, असे म्हटले आहे.
जेडीएस, काँग्रेसच्या अपात्र आमदारांना भाजपची उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2019 4:49 AM