भाजपची सत्ता जाणार, देशात अच्छे दिन फटाफट फटाफट येणार: राहुल गांधींचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 12:46 PM2024-05-29T12:46:11+5:302024-05-29T12:47:31+5:30
उन्हाच्या वाढत्या झळांचा त्रास झाल्याने डोक्यावर ओतले पाणी
बांसगाव: ४ जूननंतर केंद्रातील भाजपची सत्ता जाणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींना जनता बाय बाय करणार आहे. इंडिया आघाडीला मते खटाखट खटाखट मिळत आहेत. त्यामुळे भाजपपासून देशाची सुटका होणार असून देशात अच्छे दिन फटाफट फटाफट येणार असल्याचा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला.
इंडिया आघाडीचे सरकार केंद्रात आले तर आरक्षणावर असलेली ५० टक्क्यांची मर्यादा आम्ही रद्दबातल करणार, अशी घोषणा राहुल गांधी यांनी केली. इंडिया आघाडी जीवाची बाजी लावून राज्यघटनेचे रक्षण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेशमधील बांसगाव येथे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या समवेत मंगळवारी घेतलेल्या प्रचारसभेत त्यांनी सांगितले की, देशाची राज्यघटना व इंडिया आघाडी एका बाजूला आहेत, तर दुसऱ्या बाजूला राज्यघटना संपविण्यासाठी सज्ज असलेले लोक आहेत. इंडिया आघाडी देशाच्या राज्यघटनेला अजिबात धक्का लागू देणार नाही.
...डोक्यावर ओतले पाणी
बांसगाव येथे प्रचारादरम्यान राहुल गांधी यांना उन्हाच्या वाढत्या झळांचा त्रास झाला. यावेळी त्यांनी भाषण देत असतानाच पाणी पिले. त्यानंतर खूपच उकाडा असल्याचे म्हणत पाण्याची पूर्ण बॉटल आपल्या डोक्यावर ओतली.
उद्योगपतींना मदत
राहुल गांधी म्हणाले की, मोदी यांना देवाने गरिबांना नव्हे तर उद्योगपतींना मदत करण्याकरिता पाठविले आहे. ‘इंडिया’ सत्तेवर आल्यानंतर देशाची अर्थव्यवस्था खूप वेगाने प्रगती करेल.
‘मोदी यांच्या राजवटीत कायद्याचे राज्य संपुष्टात’
- मोदींच्या राजवटीत कायद्याचे राज्य संपुष्टात आले आहे, अशी टीका राहुल यांनी केली.
- कोणत्याही अत्याचाराविरोधात समाजातील तळागाळातला माणूस आवाज उठवू शकेल, अशी यंत्रणा आम्ही निर्माण करू.
- बाबासाहेबांचे संविधान हटवून वंचितांचे हक्क व आरक्षण हिरावून घेणे हे नरेंद्र मोदी आणि भाजपचे अंतिम ध्येय आहे, असे ते म्हणाले.