नवी दिल्ली - महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अभूतपूर्व पक्षांतर झाले होते. विरोधी पक्षात असलेले नेते आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये सामील झाले होते. भाजपने देखील या नेत्यांना सोबत घेऊन उमेदवारी दिली होती. मात्र याचा भाजपला फारसा फायदा झाला नाही. आता हाच पॅटर्न भाजप दिल्ली विधानसभा निवडणुकीत राबविण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत दिल्लीतील मुख्य तीन पक्षातील नेते एकमेकांच्या पक्षात सामील झालेले आहेत. आपच्या आमदार अलका लांबा देखील काँग्रेसमध्ये गेल्या आहेत. तर आपचे चार माजी आमदार भाजपमध्ये दाखल झाले आहे. अनेक नगरसेवकही भाजपमध्ये गेले आहेत. तिकीट वाटप झाले नसून तिकीटावरून अनेक नेते पक्ष बदलण्याची शक्यता आहे.
आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमधील अनेक नेते भाजपमध्ये दाखल झाले असून ते काही प्रमाणात सुरक्षित दिसत आहेत. आपच्या तिकीटावर आमदार झाल्यानंतर 2019 मध्ये पदावरून हटविण्यात आलेले कपिल मिश्रा, अनिल कुमार वाजपेयी यांच्याव्यतिरिक्त खासदारकी लढविणारे गुग्गन सिंह आणि काँग्रेसमधून आलेले माजीमंत्री राजकुमार चौहाण यांच्यासह आणखी काही नेत्यांची भाजपमधून दावेदारी निश्चित मानली जात आहे.
दिल्लीतील करावल नगर, गांधी नगर, बवाना, मंगोलपुरी या मतदार संघात दुसऱ्या पक्षातून आलेला उमेदवार बाजी मारू शकतो, अशी आहे. त्यामुळे महाराष्ट्रप्रमाणेच दिल्लीतही पक्षांतराचा जोर वाढणार असल्याचे राजकीय विश्लेशकांचे म्हणणे आहे.