Karnataka Elections, BJP vs Congress: कर्नाटकात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. नेतेमंडळींकडून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहेत. या दरम्यान, JDS प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी काँग्रेस-जेडीएस युतीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. निवडणुकीत काँग्रेस आणि जेडीएसमध्ये युती होणार नसल्याचे कुमारस्वामी यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर जेडीएस प्रमुखांच्या या वक्तव्यावर काँग्रेसनेही प्रत्युत्तर दिले. कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार म्हणाले, 'आम्ही ना त्यांना (जेडीएस) बोलावले आहे, ना त्यांना आमच्यासोबत येण्यास सांगितले आहे. कर्नाटकातील जनतेने काँग्रेसला मतदान करण्याचा निर्णय घेतला असून येथे आमचे सरकार स्थापन होणार आहे.' याचवेळी काँग्रेस नेत्यांनी भाजपावर सडकून टीका केली.
भाजपा ६० जागाही जिंकणार नाही!
काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. बीएस येडियुरप्पा यांनी दावा केला होता की भाजपा 150 पेक्षा जास्त जागा जिंकणार. त्यांच्या या वक्तव्यावर सिद्धरामय्या म्हणाले, भाजपा 60 जागाही जिंकू शकणार नाही. तत्पूर्वी, गुब्बी मतदारसंघातील जेडीएस आमदार श्रीनिवास यांनी काँग्रेस नेते सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.
येडियुरप्पा यांची घोषणा, निवडणूक लढवणार नाही
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी बुधवारी मोठी घोषणा केली. यावेळी आपण विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. येडियुरप्पा यांनी वयाचा हवाला देत ही घोषणा केली. म्हणाले, "मी विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मी वयाची ८० वर्षे ओलांडल्यामुळे मुख्यमंत्रीपदाचाही राजीनामा दिला होता. माझे वय 80 पेक्षा जास्त असले तरी मी यावेळीच नव्हे तर पुढच्या वेळीही राज्याचा दौरा करणार आहे. आणि एक लक्षात ठेवा की आम्हाला यावेळीच नव्हे तर पुढच्या वेळीही बहुमत मिळेल हे तुम्ही सारे पाहू शकाल." येडियुरप्पा पुढे म्हणाले, "कर्नाटकमध्ये आम्हाला पूर्ण बहुमत मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही पुन्हा सत्तेत येऊ. काँग्रेस भ्रष्ट आहे म्हणूनच ४० टक्के कमिशनचे खोटे आरोप करत आहे. कारण हा मतदारांचा प्रश्न नाही."
कर्नाटकात १० मे रोजी निवडणूक, १३ मे रोजी निकाल
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा बुधवारी जाहीर झाल्या. राज्यात १० मे रोजी मतदान होणार आहे. त्याचा निकाल 13 मे रोजी लागणार आहे. राज्यात 224 सदस्यांची विधानसभा आहे. सध्या कर्नाटकात भाजपचे सरकार आहे. या निवडणुकीत एकूण पाच कोटी 21 लाख 73 हजार 579 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. त्यापैकी २.५९ कोटी महिला, तर २.६२ कोटी पुरुष मतदार आहेत. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, राज्यात एकूण ९.१७ लाख मतदार आहेत जे पहिल्यांदाच मतदान करणार आहेत.