ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - दिल्ली महानगरपालिका निवडणूक 2017मध्ये "भाजपा"च हिट ठरणार असून "आम आदमी पार्टी" फ्लॉप ठरणार असल्याचा अंदाज वृत्तवाहिन्यांनी केलेल्या सर्व्हेक्षणाद्वारे मांडण्यात आला आहे. त्यामुळे भाजपा "आप"ला झाडूनं साफ करणार असल्याचं दिसत आहे.
वीएमआर-टाइम्स नाउ आणि एबीपी-सी वोटर यांनी केलेल्या सर्व्हेनुसार, तीन महापालिका निवडणुकांमध्ये भाजपालाच स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचं सांगण्यात आले आहे.
"टाइम्स नाउ" वृत्तवाहिन्यांनीच्या सर्व्हेक्षणानुसार, 272 जागांवर असलेल्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपाला 195 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर एबीपीच्या सर्व्हेक्षणानुसार, भाजपाला 179 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे.
या दोन्ही सर्व्हेक्षणात अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी दुस-या स्थानावर आहे. टाइम्स नाउच्या सर्व्हेनुसार "आप"ला एकूण 55 जागा मिळतील तर एबीपीच्या सर्व्हेनुसार 45 जागांवर विजय मिळेल, असा अंदाज आहे.
दरम्यान, करण्यात आलेले सर्व्हे काँग्रेससाठी चांगले नाहीत. कारण टाइम्स नाउच्या सर्व्हेमध्ये काँग्रेसला केवळ 15 तर एबीपी सर्व्हेनुसार 26 जागा जिंकता येतील, अशी शक्यता आहे. एबीपीच्या पोलनुसार उत्तर दिल्ली महापालिका निवडणुकीत भाजपाला 104 जागांपैकी 76 , दक्षिण दिल्ली महापालिका निवडणुकीत 60 तर पूर्व भागातून 43 जागा भाजपा जिंकेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
एबीपी पोलनुसार दिल्लीत भाजपासाठी मतदानाची टक्केवारी 41. 9% इतकी वाढली असून हे प्रमाण 2014 लोकसभा निवडणुकीत पार्टीला झालेल्या मतदान टक्केवारीजवळ आहे. तर "आप"ला 27.5 टक्के मतदान होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, 2015मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीत "आप"ला 55 टक्के मतदान करण्यात आले होते. या तुलनेत
आम आदमी पार्टीच्या मतदान टक्केवारी मोठ्या प्रमाणात घसरण होईल, असे दिसत आहे.
विशेष म्हणजे, दोन्ही पोलनुसार जिथे भाजपाला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी त्यांच्या कामावर दिल्लीकर खूश नाहीत. उलट तुलनेनं दिल्ली सरकारच्या कामकाजावर येथील जनता संतुष्ट आहे, असे टाइम्स नाउच्या सर्व्हेक्षणात सांगण्यात आले आहे. 23 एप्रिल रोजी दिल्ली महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदान होणार असून 26 एप्रिल रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. यावेळी भाजपा, आप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढाई या ठिकाणी पाहायला मिळत आहे.