यदु जोशी
बडोदा : भारतीय जनता पक्षाचा अभेद्य किल्ला म्हणजे बडोदा शहर. गुजरातची सांस्कृतिक व कला राजधानी अशी ओळख असलेल्या या शहरावरील मजबूत पकड भाजप यावेळीही कायम ठेवणार असे चित्र आहे. मात्र, बडोदा ग्रामीणच्या जागांवर भाजपची दमछाक होताना दिसत आहे.
महापालिका, जिल्हा परिषद, खासदार यासह सगळी सत्ताकेंद्रे भाजपच्या हातात आहेत. आपची नुसती सुरुवात आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने शहरातील पाचही जागा जिंकल्या होत्या. सर्वात कमी मताधिक्य हे ३६ हजार मतांचे होते यावरून पक्षाची ताकद लक्षात येते. रावपुरा, अकोटा, सयाजीगंज, बडोदा शहर आणि मांजलपूर या पाच शहरी मतदारसंघात पुन्हा एकदा जिंकण्याचा भाजपला विश्वास आहे. मात्र, सयाजीगंजमध्ये महापौर केयूर रोकडिया (भाजप) विरुद्ध महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या अमी रावत (काँग्रेस) यांच्यातील लढत उत्कंठावर्धक बनली आहे. अकोटामध्ये भाजपने मकरंद देसाई यांचे पुत्र चैतन्य यांना संधी दिली आहे. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसचे ऋत्विक जोशी लढत असून ते टीम राहुल गांधीचे सदस्य मानले जातात. रावपुरामध्ये कॅबिनेट मंत्री राजेंद्र त्रिवेदी यांना पत्ता कापून बाळकृष्ण शुक्ला यांना भाजपने संधी दिली आहे.
@७५ चा त्यांच्यासाठी भाजपने केला अपवादभाजपमध्ये ७५ वर्षांवरील व्यक्तीला तिकिट नाही हा नियम आहे पण योगेश पटेल यांच्याबाबत अपवाद करण्यात आला आहे. ७६वर्षांचे पटेल हे सातवेळा आमदार आहेत आणि आठव्यांदा मांजलपुर मतदार संघात रिंगणात आहेत. ७५ वर्षांवरील भाजपचे ते एकमेव उमेदवार आहेत.
सत्यजित गायकवाड यांच्या लढतीबाबत उत्सुकता माजी खासदार सत्यजितसिंह गायकवाड हे वाघोडियामधून लढत आहेत. भाजपचे साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंह भोसले यांच्या भगिनी ओजस्विता राजे या सत्यजितसिंह यांच्या पत्नी. भाजपचे आमदार मधु श्रीवास्तव बंडखोरी करून अपक्ष लढत असल्याने गायकवाड (काँग्रेस) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, भाजपची डोकेदुखी वाढली आहे.
मराठी शाळांची दुरवस्था; गुजराती-मराठी वाद नाहीnबडोद्यात मराठी मतांचा टक्का खूप मोठा पण मराठी मुलेदेखील इंग्रजी वा गुजराती माध्यमाच्या शाळांमध्ये शिकतात. nपूर्वी मराठी माध्यमाच्या लहानमोठ्या ३८ शाळा होत्या. आता एक खासगी आणि महापालिकेची एक अशा दोनच मराठी शाळा उरल्या आहेत. तेथे विद्यार्थी संख्याही घटत आहे. nगुजराती विरुद्ध मराठी भाषक असे कोणतेही चित्र बडोद्यात दिसत नाही. दोघेही मिळूनमिसळून राहतात. nभाजपने बाळकृष्ण शुक्ला (रावपुरा) तर काँग्रेसने सत्यजितसिंह गायकवाड (वाघोडिया) अशा दोन मराठी उमेदवारांना संधी दिली आहे.
विनोद तावडे, पृथ्वीराजबाबा सांभाळताहेत जबाबदारी
बडोदा ग्रामीण आणि छोटा उदयपूर जिल्ह्यात भाजपच्या संपूर्ण रणनीतीची जबाबदारी आहे ती राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर. येथे तळ ठोकून त्यांनी डॅमेज कंट्रोल जोरात सुरू केले आहे. बडोदा ग्रामीणच्या पादरा मतदारसंघात माजी आमदार दिनूमामापटेल तर वाघोडियामध्ये सहावेळचे भाजप आमदार मधू श्रीवास्तव अपक्ष लढत असल्याने पक्षाची अडचण वाढली आहे.दुसरीकडे बडोदा भागातील ४० विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे निरिक्षक म्हणून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जबाबदारी सांभाळत आहेत.महाराष्ट्रातील या दाेन्ही नेत्यांवर गुजरात विधानसभा निवडणुकीत माेठी जबाबदारी देण्यात आली आहे.