वाराणसी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना काळजी घेण्याचा सल्ला दिल्यानंतरही भाजपाची नेतेमंडळी सुधण्याचे नाव घेत नाहीये. भाजपांच्या नेत्यांचा वाचाळपणा कायम असून, आता भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी चौबे यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 2019नंतर राहुल गांधींना स्मशानात पोहोचवण्यासाठीही चार लोक मिळणार नाहीत, असे वक्तव्य चौबे यांनी केले आहे. चौबे यांच्या या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. अश्विनी चौबे यांनी बाबतपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तेव्हा राहुल गांधींनी 15 मिनिटे बोलण्याची संधी देण्याच्या मोदींना दिलेल्या आव्हानावरून राहुल गांधींवर टीका करताना ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेर आहेत. आता राहुल गांधींनी सव्वाशेर बनण्याचा प्रयत्न करू नये. काँग्रेस अध्यक्ष लोकसभेमध्ये गप्प बसून असतात. त्यांच्या बोलण्यामध्ये काहीच तथ्य नसते. पुढच्या वेळीही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशात एक सशक्त आणि भक्कम असे रालोआचे सरकार बनेल. तर काँग्रेस चारीमुंड्या चीत होईल. त्यानंतर काँग्रेस पक्षाला स्मशानात घेऊन जाण्यासाठीही चार जण मिळणार नाहीत."
...तर स्मशानात पोहोचवण्यासाठीही चार माणसं मिळणार नाहीत, राहुल गांधींवर टीका करताना केंद्रीय मंत्र्यांची जीभ घसरली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2018 9:48 AM