नवी दिल्ली : मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाला पराभवाचा धक्का बसला असला, तरी लोकसभेच्या निवडणुकीत इथले मतदार पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच साथ देतील आणि त्या जोरावर काँग्रेस सपाट होईल, असा अंदाज एबीपी-सी व्होटरच्या सर्वेक्षणात वर्तवण्यात आला आहे.
लोकसभेच्या मध्य प्रदेशातील एकूण २९ जागांपैकी २३ जागा भाजपाला, तर केवळ ६ जागा काँग्रेसला मिळतील, असा जनमत चाचणीचा निष्कर्ष आहे. भाजपाला काँग्रेसपेक्षा ४ टक्के जास्त मतं मिळतील, असंही नमूद करण्यात आलंय.
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीचे निकाल ११ डिसेंबरला लागले होते. त्यात भाजपाचे बारा वाजले होते. तीनही राज्यं भाजपाच्या हातातून गेली होती आणि त्यांच्या या गडांवर काँग्रेसनं झेंडा फडकवला होता. परंतु, लोकसभेचं आणि विधानसभेचं गणित वेगळं असतं, असेच संकेत ताज्या जनमत चाचणीतून मिळताहेत. मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसपेक्षा एक टक्का जास्त मतं मिळवूनही भाजपाला सत्ता गमवावी लागली होती. काँग्रेसला ११४ जागा मिळाल्या होत्या, तर भाजपाला १०९ जागांपर्यंत मजल मारता आली होती. मध्य प्रदेशचा मतदार शिवराजसिंह चौहान यांच्यावर अगदीच नाराज नसल्याचं हे आकडे स्पष्ट सांगत होते. ही जनता मोदींवर अजिबातच नाराज नसल्याचं सी व्होटर आणि एबीपी यांनी केलेल्या सर्वेक्षणातून समोर आलंय.
गेल्या निवडणुकीत मध्य प्रदेशात काँग्रेसला दोन जागा मिळाल्या होत्या. त्या सहापर्यंत वाढत असल्या, तरी भाजपाप्रणित एनडीए २३ जागा मिळवून मुसंडी मारेल, अशी चिन्हं आहेत. आता देशाचा हा मूड निवडणुकीपर्यंत टिकतो का, मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार तो बदलण्यासाठी काय प्रयत्न करतं, हे पाहावं लागेल.