'अब तक 56 नहीं, अब 55'; अमित शहांनी केली मोठी भविष्यवाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 08:46 PM2019-05-10T20:46:46+5:302019-05-10T20:47:17+5:30
लोकसभेच्या सहाव्या टप्प्याचा प्रचार आज संपला असून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भाजपा किती जागा जिंकेल याचा आकडा सांगितला आहे.
नवी दिल्ली : लोकसभेच्या सहाव्या टप्प्याचा प्रचार आज संपला असून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भाजपा किती जागा जिंकेल याचा आकडा सांगितला आहे. गेल्या लोकसभेला भाजपा 282 जागांवर जिंकली होती. देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्याचा फायदा भाजपाला होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे त्यापेक्षा जास्त जागा जिंकणार असल्याचा दावा शहा यांनी केला आहे.
लोकसभेच्या 2014 निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले होते. तेव्हा 543 पैकी 282 जागांवर विजय मिळाला होता. यामुळे अमित शहा यांनी तेव्हापेक्षा 55 जागा जास्त मिळणार असल्याचा दावा करत आहेत. म्हणजेच कमीत कमी 337 जागा जिंकणार असल्याचे शहा यांनी सांगितले आहे.
देशातील समुद्रकिनाऱ्यावरील आणि पुर्वेकडील राज्यांमध्ये भाजपाची स्थिती मजबूत झाली आहे. यामुळे तेथे भाजपा बहुमत प्राप्त करेल. पश्चिम बंगालमध्ये भाजपाला 23 जागा मिळणार असल्याचा दावाही त्यांनी केला. ओडिशामध्ये 13 ते 15 जागा मिळतील. याआधी भाजपाला या राज्यांत दोन आणि एकच जागा मिळाली होती. भाजपाने देशभरातील 120 अशा जागांवर ताकद लावली आहे जेथे जिंकण्याची शक्यता जास्त आहे, असेही शहा म्हणाले. यापैकी किमान 55 जागा भाजपा जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच राहुल आणि प्रियंका गांधी यांच्यावर टीका करताना भुतकाळापासून पळू शकत नसल्याचे म्हटले आहे. 23 तारखेलाच समजेल कोण गाशा गुंडाळेल, असेही शहा म्हणाले.