Arvind Kejriwal : दिल्लीतील कथित मद्य घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टानं जामीन दिला आहे. सुप्रीम कोर्टानं केजरीवाल यांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. तब्बल ५० दिवसांनी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत मी तुमच्यात परतल्याने खूप आनंदी आहे असं म्हटलं. आपण सर्वांनी मिळून आपल्या देशाला हुकूमशाहीपासून वाचवायचे आहे,असं केजरीवाल यांनी म्हटलं. यासोबत केजरीवाल यांनी उद्धव ठाकरेंबाबतही मोठं वक्तव्य केलं आहे. भाजपाचा विजय झाला तर उद्धव ठाकरेसंह इतर नेते तुरुंगात जातील, असा गंभीर दावा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
तिहार तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या पक्ष कार्यालयात जाऊन पहिलं निवडणुकीतील भाषण केलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.भाजपाने एका वर्षात आम आदमी पक्षाचे चार मोठे नेते तुरुंगात टाकले. पंतप्रधान मोदींनी आपला पूर्ण नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला, असं म्हणत केजरीवाल यांनी मोदींवर निशाणा साधला. केजरीवाल यांनी आपल्या २१ मिनिटांच्या भाषणात महाराष्ट्राच्या राजकारवही भाष्य केलं.
"पंतप्रधान मोदी हे एक राष्ट्र, एक नेता मोहीम सध्या राबवत आहेत. त्यामुळे त्यांनी मला तुरुंगात टाकून त्यांनी देशातील सर्व विरोधकांना याचा संदेश दिला आहे. जर हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल यांना आम्ही तुरुंगात टाकू शकतो, तर ४ जून रोजी सत्ता आली तर देशातील कोणत्याही नेत्याला आम्ही तुरुंगात टाकू शकतो. जर ते पुन्हा जिंकले तर ममता बॅनर्जी, एमके स्टॅलिन, तेजस्वी यादव, पिनाराई विजयन, उद्धव ठाकरे आणि इतर विरोधी नेते तुरुंगात जातील," असा आरोप केजरीवालांनी केला.
"मला तुरुंगात टाकून मोदी म्हणतात की, ते भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत आहेत. पण त्यांनी स्वतःच्या पक्षातच देशातील सर्वात मोठ्या भ्रष्टाचाऱ्यांना, चोरांना आश्रय दिलाय. ज्यांच्यावर १० दिवसांपूर्वी ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केला, त्यांनाच पक्षात घेऊन उपमुख्यमंत्रीपद दिलं आणि म्हणतायत भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात लढाई लढायची असेल तर मोदींनी केजरीवालांकडून शिका," असेही केजरीवाल म्हणाले.