प्रचंड हिंसाचार, हत्या, मतपेट्यांची पळवापळव यामुळे गाजलेल्या पश्चिम बंगालमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. या निकालांमध्ये ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस निर्विवादपणे पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. तृणमूल काँग्रेसने अनेक ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांमध्ये आघाडी घेतली आहे. तर भारतीय जनता पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. तृणमूल काँग्रेसच्या तुलनेत भाजपाला फार कमी जागा मिळाल्या आहेत. मात्र गेल्या निवडणुकीपेक्षा भाजपाच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. भाजपाने २०१८ च्या निवडणुकीमध्ये केवळ ५७७९ जागा जिंकल्या होत्या. तर यंदाच्या निवडणुकीत भाजपाने आतापर्यंत ८२०० जागांवर विजय मिळवला आहे. तर डावे पक्ष आणि काँग्रेसची मात्र या निवडणुकीत पिछेहाट झाली आहे.
दरम्यान, राज्यातील पंचायत निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तीनही स्तरावरवर बहुमत मिळवलं आहे. तृणमूलने ३,३१७ ग्रामपंचायतींपैकी २५५२ ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. याशिवाय, २३२ पंचायत समित्या आणि २९ जिल्हा परिषदांपैकी १२ वर आपला झेंडा फडकवला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हे मोठं यश मानलं जात आहे.
तर भाजपाला राज्यात केवळ 212 ग्रामपंचायती आणि 7 पंचायत समित्या जिंकता आल्या आहेत. तर भाजपाच्या खात्यात एकही जिल्हा परिषद गेलेली नाही. मात्र काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसला मागे सारत भाजपा दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.