ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. ३ - गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत सत्तेवर येण्यासाठी भाजपाने पाकिस्तानमधून पैसे जमा केले होते असा आरोप जदयूने केला आहे. त्यामुळेच देशात तिरंगा जाळला जात असतानाही भाजपाने मौन धारण केले आहे अशी टीकास्त्रही जदयूचे प्रवक्ते अजय आलोक यांनी सोडले आहे.
नितीशकुमार यांनी बिहार निवडणुकीतील प्रचाराची जाहिरात पाकमधील एका वृत्तपत्राच्या वेबसाईटला दिल्याचा आरोप भाजपाने केला होता. या आरोपानंतर मंगळवारी जदयूने भाजपावर पलटवार केला आहे. नरेंद्र मोदी सरकारने गेल्या वर्षी सत्ता स्थापनेच्यावेळी पाकिस्तानमधील डॉन या वृत्तपत्रात जाहिरात देऊन तेथील लोकांकडून आर्थिक मदत मागितली होती. मोदी सरकारच्या स्थापनेत पाकची भूमिका महत्त्वाची होती असा आरोपही त्यांनी केला आहे. भाजपाने पाकमधून किती पैसे जमा झाले हे जाहीर करावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.