- सुहास शेलारऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय प्रतिष्ठेचा विषय बनलेल्या जिंद विधानसभा पोटनिवडणुकीत मिळालेल्या विजयामुळे भाजपा कार्यकर्त्यांत पुन्हा उत्साह निर्माण झाला. हाच उत्साह लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकवून ठेवण्यासाठी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर प्रयत्नशील आहेत. तर दुसरीकडे प्रतिस्पर्धी काँग्रेस मात्र अंतर्गत वादविवाद सोडविण्यात मग्न आहे.तीन राज्यांतील पराभवानंतर भाजपाच्या हरियाणा गडालाही सुरूंग लावण्याचा मनसुबा राहुल गांधी यांनी आखला. त्यासाठीची पूर्वतयारी म्हणून जिंद पोटनिवडणुकीची निवड केली. राष्ट्रीय प्रवक्ते रणजीत सुरजेवाला यांना तेथून आखाड्यात उतरवले. ते मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, अपेक्षाभंगच झाला. सुरजेवाला यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. जाटांचा प्रभाव असलेल्या या मतदारसंघात पहिल्यांदाच कमळ खुलले. त्यामुळे भाजपाच्या गडाच्या शिळा निखळण्याऐवजी घट्ट झाल्या.ज्येष्ठ नेत्यांना डावलून सुरजेवाला यांना उमेदवारी दिल्याने स्थानिक काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी बंड केले. ‘हरियाणातील काही नेत्यांनी अप्रत्यक्षरित्या माझ्या विरोधात प्रचार करण्याची सूचना कार्यकर्त्यांना दिली’, असा आरोप थेट आरोप पत्रकार परिषदेतून करत सुरजेवाला यांनी स्थानिक नेत्यांना आपल्या पराभवास जबाबदार धरले. शिवाय पक्षश्रेष्ठी या पराभवाची मीमांसा करून अंतर्गत बंडखोरांना जागा दाखवतील, अशी तंबीही त्यांनी या वेळी दिली. त्यामुळे सुरजेवाला राहुल गांधींचे कान भरतात, अशी भावना मनात ठेवून तेथील ज्येष्ठ नेते सध्या वावरत आहेत. त्यामुळे जेथे भाजपाच्या प्रचाराला उभारी मिळाली आहे, तेथे काँग्रेस कार्यकर्त्यांत मात्र निरुत्साह आहे.तुल्यबळ प्रतिस्पर्धी नाहीच.हरियाणात काँग्रेसच्या प्रचाराला जरी गती मिळत नसली, तरी इंडियन नॅशनल लोकदल (इनेलो)ने मात्र जोरदार प्रचाराला सुरूवात केली आहे. हांसी येथील इनेलोच्या रॅलीला मिळालेला प्रतिसाद पाहता भाजपाला त्यांच्याकडून कडवी टक्कर मिळण्याची शक्यता आहे.मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर चार आमदार आणि अनेक वरिष्ठ नेत्यांनी इनेलोला रामराम ठोकत जननायक जनता पार्टीत प्रवेश केल्याने त्यांना मोठा हादरा बसला आहे. दुसरीकडे जननायक जनता पार्टी या नवोदीत पक्षाने जिंदच्या पोटनिवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवून सगळ््यांनाच आश्चर्यचकीत केले होते. त्यावेळेस ‘आप’ने त्यांना पाठिंबा दिला होता. मात्र, आता आप स्वबळावर लढण्याची तयारी करीत आहे. त्यामुळे भाजपाचा रथ रोखण्यासाठी त्यांनी मोठी घोडदौड करावी लागणार आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मात्र, सर्वसामान्य मतदारांना खूष करण्यासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या. त्यांना मतदार भुलतील का? हे निकालानंतरच कळेल.भाजपा देणार आयारामांना संधी?मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचे माध्यम सल्लागार राजीव जैन यांनी एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले होते की, ‘हरियाणात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता सर्वेक्षणांनी वर्तविली आहे. जिंद पोटनिवडणुकीच्या विजयानंतर विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना भाजपाच्या विजयाचा अंदाज आल्याने ते भाजपात येऊ इच्छित आहेत. त्यामुळे निवडणूक जाहीर झाल्यानंतर विरोधी पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते भाजपात दिसल्यास नवल वाटायला नको.’
हरियाणातील ‘जिंद’ जिंकल्याने भाजपा जोरात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 6:34 AM