'या' राज्यात स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत न लढताच भाजपानं ७० टक्के जागा जिंकल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 08:36 AM2024-07-24T08:36:22+5:302024-07-24T08:38:21+5:30
भाजपानं १८८ जागांवर उमेदवार उतरवले आहेत. तर सीपीआय १४८ आणि काँग्रेसनं ९८ जागांवर उमेदवार उभे केले आहेत.
नवी दिल्ली - त्रिपुरामध्ये सत्ताधारी भाजपानं राज्यातील त्रिस्तरीय पंचायत व्यवस्थेत जवळपास ७० टक्के जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. पंचायत प्रणालीत एकूण ६८८९ जागा आहेत. ज्यात ग्राम पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांचा समावेश आहे. या जागांपैकी भाजपानं ४८०५ जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. ग्रामपंचायतीत भाजपानं ६३७० पैकी ४५५० जागांवर बिनविरोध विजय मिळवला आहे त्यामुळे ७१ टक्के जागांवर कुठलंही मतदान होणार नाही.
राज्य निवडणूक आयोगाचे सचिव असित कुमार दास यांनी म्हटलं की, ज्या १८१९ ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे. त्यात भाजपानं १८०९, सीपीआय(एम) १२२२ आणि काँग्रेसनं ७१३ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. पश्चिम त्रिपुरा जिल्ह्यातील महेशखला पंचायतीच्या एका जागेवर निवडणूक होणार नाही जिथं भाजपाच्या उमेदवाराचं निधन झालं आहे. पंचायत समितीत भाजपानं एकूण ४२३ जागांपैकी २३५ म्हणजे ५५ टक्के बिनविरोध जिंकल्या आहेत. आता १८८ जागांसाठी मतदान होणार आहे.
तसेच भाजपानं १८८ जागांवर उमेदवार उतरवले आहेत. तर सीपीआय १४८ आणि काँग्रेसनं ९८ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. भाजपानं ११६ जिल्हा परिषदेच्या जागांमध्ये २० जागांवर बिनविरोध विजय मिळवला आहे. भाजपानं सर्व ९६ जिल्हा परिषद जागांवर उमेदवार उतरवले आहे तर सीपीआयनं ८१ आणि काँग्रेसनं ७६ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. उमेदवारी अर्ज परत घेण्याची अखेरची तारीख २२ जुलै होती. याठिकाणी ८ ऑगस्टला मतदान पार पडणार आहे. तर मतमोजणी १२ ऑगस्टला होईल. मागील निवडणुकीत भाजपानं त्रिस्तरीय पंचायत प्रणालीतत ९६ टक्के जागांवर बिनविरोध विजय मिळवला होता.