पोटनिवडणुकीत गमावलेल्या जागा भाजपने पुन्हा जिंकल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2019 12:07 PM2019-05-25T12:07:10+5:302019-05-25T12:08:03+5:30
गेल्या वर्षी भाजपला उत्तर प्रदेशातील गोरखपूर, फुलपूर आणि केराना तसेच महाराष्ट्रातील भंडारा-गोंदिया मतदार संघात झालेल्या पोट निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता.
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने २०१९ लोकसभा निवडणुकीत मोठ्या विजयाची नोंद केली. भाजपप्रणीत एनडीएने ३५० हून अधिक जागा जिंकत मोदी लाट पुन्हा आल्याचे दाखवून दिले. तसेच मागील दोन वर्षात देशात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने काही जागा गमावल्या होत्या. त्यामुळे मोदी लाट ओसरल्याचे बोलले जात होते. मात्र या निवडणुकीत भाजपने पोट निवडणुकीत गमावलेल्या जागा देखील आपल्या नावे केल्या.
गेल्या वर्षी भाजपला उत्तर प्रदेशातील गोरखपूर, फुलपूर आणि केराना तसेच महाराष्ट्रातील भंडारा-गोंदिया मतदार संघात झालेल्या पोट निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. या मतदार संघात भाजपने पुन्हा एकदा मुंसडी मारली. त्यामुळे विरोधकांची एकी करून लढण्याची चाल फसल्याचे चित्र आहे.
उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा गड असलेल्या गोरखपूर मतदार संघात गेल्या वर्षी बसपाच्या पाठिंब्यावर सपाच्या उमेदवाराने विजय मिळवला होता. मात्र या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार रवी किशन यांनी विजयाची नोंद केली. फुलपूर मतदार संघात देखील तेच घडले. सपाच्या नागेंद्र यादव यांनी पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला होता. आता मात्र भाजपच्या केशरी देवी पटेलने येथे विजय मिळवून हा मतदार संघ भाजपला मिळवून दिला. तर केरानामध्ये देखील भाजपच्या प्रदीप कुमार यांनी सपा-बसपा युतीच्या तबस्सुम हसनचा पराभव केला.
दरम्यान महाराष्ट्रात नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या भंडारा गोंदिया मतदार संघात पोटनिवडणूक झाली होती. यामध्ये राष्ट्रवादीने शानदार विजय मिळवला होता. आता मात्र राष्ट्रवादीच्या नाना पंचबुद्धे यांचा भाजपच्या सुनील मेंढे यांनी पराभव केला.