नवी दिल्ली - नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा मोठा फटका थेट भारतीय जनता पक्षाला (BJP) बसला आहे. पंजाबमध्ये नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. सुरुवातीपासूनच काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दल या पक्षांनी जोरदार मुसंडी मारली होती. भाजपा खासदारसनी देओल (Sunny Deol) यांच्या लोकसभा मतदारसंघात भाजपाला मोठा धक्का बसला असून नाकी नऊ आले आहेत. विशेष म्हणजे मोहाली महानगरपालिकेत भाजपाला एकही जागा जिंकता आली नाही.
मोहाली महापालिका निवडणुकीत दुसऱ्यांदा आझाद ग्रुपच्या माध्यमातून निवडणूक लढविणाऱ्या माजी महापौर कुलवंत सिंग यांचा 267 मतांनी पराभव झालाय. मात्र, त्यांचा मुलगा सरबजीत सिंग यांना विजय मिळाला आहे. या निवडणुकीत आझाद ग्रुपच्या 11 उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर दोन वार्डात अपक्ष उमेदवारांना यश प्राप्त झालंय. विशेष म्हणजे 37 जागांवर काँग्रेसने विजय मिळवला असून भाजपला खातेही खोलता आले नाही. तसेच, शिरोमणी अकाली दलाच्या उमेदवारांनाही एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही.
सनी देओलच्या मतदारसंघातही पराभव
भाजपा खासदार सनी देओल यांच्या गुरदासपूर मतदारसंघातील सर्व 29 जागांवर भाजपचा पराभव झाला असून, या जागांवर काँग्रेसचा विजय झाल्याची माहिती मिळाली आहे. अकाली दलासोबतची युती तुटल्यानंतर प्रथमच एकट्याने निवडणूक लढवणाऱ्या भाजपाला अनेक ठिकाणी पराभव पत्करावा लागला आहे. मजिठामध्ये 13 पैकी 10 जागांवर अकाली दलाने, तरणतारणमधील भिखिविंड नगरपंचायतीमध्ये काँग्रेसने 11 तर अकाली दलाने 2 जागांवर विजय मिळवला आहे. राजकोटमधील सर्व 15 जागांवर काँग्रेसने बाजी मारली आहे. जलालाबादमध्ये 17 पैकी 9 जागांवर काँग्रेस विजयी झाली आहे. नंगल, लोहियाँ आणि नूरमहल येथेही काँग्रेसने विजय मिळवला आहे. राजपूरामध्ये 27 जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे. मोगामध्येही काँग्रेस मोठा पक्ष ठरला आहे.
गुरुदासपूरमध्ये भाजपा उमेदवाराला केवळ 9 मते
सनी देओल यांचा मतदारसंघ असणाऱ्या गुरुदासपूरमध्ये भाजपाच्या उमेदवाराला फक्त नऊ मतं मिळाली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुदासपूर नगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 12 मधून भाजपाच्या किरण कौर या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. मात्र त्यांना अवघी नऊ मतं मिळाली आहेत. यामुळेच संतप्त झालेल्या किरण कौर यांनी निवडणुकीत घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच माझ्या घरातच 15 ते 20 मतदार आहेत. या सर्वांनी मला मत दिलं होतं. तरी देखील फक्त 9 मतं कशी पडली असा सवाल विचारत काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.