मध्य प्रदेशमध्ये पंतप्रधान मोदींच्या रॅलीत सहभागी होण्यासाठी भोपाळला जाणाऱ्या कार्यकर्त्यांची बस एका ट्रकला धडकली. ज्यामध्ये भाजपाचे 39 कार्यकर्ते जखमी झाले. खरगोन जिल्ह्यातील कसरावद पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली. भाजपाचे कार्यकर्ते पीएम मोदींच्या सभेत सहभागी होण्यासाठी भोपाळला जात होते. वाटेत उभ्या असलेल्या ट्रकला बसची धडक बसली, त्यामुळे 39 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे सर्वांवर उपचार सुरू आहेत. सर्व जखमी भगवानपुरा विधानसभेच्या रुपगड, राय, सागर आणि खापरजामली येथील रहिवासी आहेत. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या पोलीस या घटनेचा तपास करण्यात व्यस्त आहेत.
कसरावद आणि मंडलेश्वरचे एसडीओपी मनोहर गवळी यांनी सांगितले की, कसरावद पोलीस स्टेशन हद्दीतील गोपाळपुरा गावाजवळ एका खासगी प्रवासी बसची तेथे उभ्या असलेल्या ट्रकला धडक बसली. अपघातात जखमी झालेल्या लोकांना थेट खरगोन येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे सर्वांवर उपचार सुरू आहेत.
बसच्या चालकाला मोठ्या कष्टाने बाहेर काढण्यात आले. क्रेनच्या सहाय्याने ट्रक आणि बस रस्त्यापासून वेगळे करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. खरगोन जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ. अमरसिंह चौहान यांनी सांगितले की, या घटनेत 39 जण जखमी झाले आहेत. या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्यांना इंदूरला रेफर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.