NDA Meeting PM Narendra Modi: एनडीए संसदीय पक्षाच्या नेत्याची निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी एनडीएच्या सर्व पक्षांचे आभार मानले. लोकसभा निवडणुकीच्या निकालांची राज्यनिहाय माहिती देताना पंतप्रधान मोदी यांनी केरळच्या निकालांचे भरभरून कौतुक केले. केरळमध्ये भाजप आणि एनडीएच्या कार्यकर्त्यांवर काश्मीरपेक्षाही जास्त अत्याचार झाले, असा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणावेळी केला. तसेच, केरळमधून पहिल्यांदाच जिंकलेल्या खासदाराचे अभिनंदन केले.
"केरळमधील दोन जागांवर भाजपाने चमकदार कामगिरी केली. केरळमधील त्रिशूर लोकसभा मतदारसंघात भाजपासाठी विजय मिळवून सुरेश गोपींनी इतिहास रचला आहे. याशिवाय राजीव चंद्रशेखर यांनी शशी थरूर यांना तगडी टक्कर दिली आहे. मात्र, त्यांला विजय मिळवण्यात अपयश आले. असे असले तरी केरळमध्ये भाजपाने चांगले काम केले. केरळमध्ये भाजप आणि एनडीएच्या कार्यकर्त्यांवर जेवढा अत्याचार झाला तेवढा काश्मीरमध्येही झाला नसेल. पण सगळ्या गोष्टींवर मात करून भाजपाने केरळमध्ये जागा जिंकली. त्याचे मनापासून अभिनंदन," अशा शब्दांत मोदींनी नवनिर्वाचित खासदार सुरेश गोपी यांचे कौतुक केले.
"त्रिशूरमधील भाजप नेत्याचा विजय हा सत्ताधारी सीपीआय(एम) नेतृत्वाखालील एलडीएफ आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफसाठी एक धक्का आहे, ज्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत विविध एक्झिट पोल नाकारले होते. या एक्झिट पोलमध्ये गोपींचा विजय आणि राज्यात कमळ फुलण्याची म्हणजेच भाजपच्या विजयाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती," याकडेही मोदींनी लक्ष वेधले.