नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सतत चर्चेत राहणारे गिरीराज सिंह यांना बिहारचे मुख्यमंत्री करण्याची मागणी करण्यात येत आहे. भाजपाचे कार्यकर्ते आणि गिरीराज सिंह यांच्या समर्थकांकडून ही मागणी केली जाते आहे. बिहारमधीलबेगूसराय लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवल्यानंतर गिरीराज सिंह यांनी रविवारी आपल्या समर्थकांची भेट घेतली. यावेळी समर्थकांनी गिरीराज सिंह यांच्यासारखा बिहारमधील पुढील मुख्यमंत्री व्हावा, अशी घोषणाबाजी केली.
भाजपाच्या एका नेत्याने सांगितले की, बिहारचे पुढील मुख्यमंत्री गिरीराज सिंह व्हावेत, अशी पार्टीच्या कार्यकर्त्यांची आणि त्यांच्या समर्थकांची इच्छा आहे. कार्यकर्ते आणि त्यांच्या समर्थकांच्या या मागणीमुळे सध्याचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, बिहारमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी गिरीराज सिंह यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार, लोक जनशक्ती पार्टीचे प्रमुख व केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्यावर इफ्तार पार्टीचे आयोजन केल्यामुळे ट्विटरवरुन त्यांच्यावर निशाना साधला होता. यामध्ये नितीश कुमार यांनी राज्यभरात आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टींमध्ये लावलेल्या उपस्थिती म्हणजे केवळ दिखावा असल्याचे म्हटले होते. याबाबत गिरीराज सिंह यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून नितीश कुमारांचे इफ्तार पार्टीतील काही फोटोज देखील शेअर केले होते.
दरम्यान, नितीश कुमार यांच्यावर टीका केल्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी गिरीराज सिंह यांना चांगलेच सुनावले. अमित शहा यांनी गिरीराज सिंह यांना फोन करून, यापुढे अशा प्रकारचे कोणतेही वक्तव्य करण्यास सक्त मनाई केली आहे.