2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने विरोधकांपेक्षा चार पट रक्कम केली खर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 09:04 AM2019-10-11T09:04:02+5:302019-10-11T09:09:23+5:30
महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.
नवी दिल्ली - महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. देशातील दोन्ही प्रमुख पक्ष असलेले भाजपा व काँग्रेसने आपापल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. 2014 पर्यंत या दोन्ही राज्यांची सत्ता काँग्रेसच्या हाती होती. मात्र यानंतर आलेल्या मोदी लाटेत काँग्रेसच्या हातून राज्ये निसटत गेली. मागील पाच वर्षांपासून दोन्ही राज्यात भाजपाचे मुख्यमंत्री आहेत. आता परत एकदा महाराष्ट्र व हरियाणामध्ये भाजपाला धक्का देत काँग्रेस सत्तेवर येणार की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 2014 च्या महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणुकीत 15 राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांनी 280 कोटी रुपये प्रचारासाठी वापरले आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीत भाजपाने विरोधकांपेक्षा चार पट रक्कम खर्च केल्याची माहिती समोर आली आहे.
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म (ADR)) या संस्थेने 2014 च्या विधानसभा निवडणुकीतील राजकीय पक्षांच्या जमा-खर्चाचा अहवाल गुरुवारी (10 ऑक्टोबर) प्रसिद्ध केला आहे. यामध्ये निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांना किती निधी मिळाला आणि त्यांनी तो कसा खर्च केला याबाबात माहिती देण्यात आली आहे. 2014 च्या महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणुकीसाठी 15 राजकीय पक्षांना 464.55 कोटींचा निधी मिळाला होता. त्यापैकी 357.21 कोटी रुपये पक्षांनी खर्च केले.
भाजपाला यामध्ये सर्वाधिक म्हणजे 296.74 कोटींचा निधी मिळाला होता. त्यापैकी 217.68 खर्च करण्यात आले. तर काँग्रेसने 84.37 कोटींपैकी 55.27 कोटी खर्च केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने 41 कोटी, शिवसेनेने 17.94 कोटी खर्च केल्याची माहिती मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. राजकीय पक्षांनी विविध माध्यमांवरील जाहिरातींसाठी सर्वाधिक खर्च केला आहे. त्यासाठी 245.22 कोटी खर्च करण्यात आले आहेत. महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा या दोन्ही राज्यांत 21 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे; तर 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. मतदारराजाने दिलेला कौल धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येलाच निकालाच्या स्वरूपात जाहीर होईल आणि ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर नवे सरकार सत्तारूढ होण्याचा मार्ग मोकळा झालेला असेल. राज्यातील सुमारे नऊ कोटी मतदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला पुन्हा संधी देणार की, 2014 प्रमाणे राज्यात सत्तांतर घडवून आणणार, याची संपूर्ण देशाला उत्सुकता लागून आहे.