काँग्रेसची फिक्स ‘व्होट बँक’ फोडण्याचा भाजपचा प्रयत्न; कुमारी शैलजा तिकीटवाटपावरून नाराज
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 07:43 AM2024-09-20T07:43:15+5:302024-09-20T07:45:31+5:30
कुमारी शैलजा यांना तिकीटवाटपात ९ जागा मिळाल्या होत्या. त्यावरून त्या नाराज होत्या. त्यांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती; परंतु, काँग्रेस नेतृत्वाने त्याची परवानगी दिली नाही.
आदेश रावल
नवी दिल्ली : हरयाणात दहा वर्षे सत्तेत असलेला भाजप आगामी विधानसभा निवडणुकीत हॅटट्रिक साधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. दुसरीकडे काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य सुरू आहे. काँग्रेसच्या मागासवर्गीय नेत्या खासदार कुमारी शैलजा तिकीटवाटपावरून नाराज आहेत. त्याचा फायदा उचलून काँग्रेसची पारंपरिक व्होट बँक फोडण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे.
कुमारी शैलजा यांना तिकीटवाटपात ९ जागा मिळाल्या होत्या. त्यावरून त्या नाराज होत्या. त्यांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती; परंतु, काँग्रेस नेतृत्वाने त्याची परवानगी दिली नाही. गुरुवारी जनतेला सात हमी देणारा काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध झाला. त्या कार्यक्रमालाही शैलजा अनुपस्थित होत्या.
हरयाणात मागासवर्गीय मतदार काँग्रेसच्या बाजूने आहेत, याची भाजपला जाणीव आहे. लोकसभा निवडणुकीतही राज्यघटनेच्या मुद्द्यावर मागासवर्गीयांनी ‘इंडिया’ आघाडीवरच विश्वास टाकला होता. आता भाजपचा मागासवर्गीयांच्या मतांवर डोळा आहे; आणि भाजप नेते आक्रमकतेने कुमारी शैलजा यांचा मुद्दा उचलून धरत आहेत. एका मागासवर्गीय नेत्याला काँग्रेस मुख्यमंत्री का बनवू शकत नाही, असा प्रचार भाजप करीत आहे. अशा परिस्थितीत सर्वांच्या नजरा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आगामी प्रचारसभांकडे लागल्या आहेत. त्यात नेत्यांना एकजुटीचा संदेश द्यावा लागणार आहे. त्यात काही कमतरता राहिली तर मात्र काँग्रेसला मागासवर्गीयांच्या मतांचा फटका बसू शकतो.