नितीन अग्रवाल नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत मतदारांंना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्ष चढाओढीने सोशल मीडियाचा वापर करीत आहेत. तथापि, सोशल मीडियावरील जाहिरातीसाठी भाजप सर्वाधिक खर्च करीत आहेत. फेसबुकच्या ताज्या आकडेवारीनुसार भाजप आणि पंतप्रधानांसाठी ६.६ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
भाजपने २० एप्रिलपर्यंत फेसबुकवर जाहिरातींसाठी १.३२ कोटी रुपये खर्च केले आहेत. याशिवाय भारताच्या ‘मन की बात’साठी२.२४ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. माय फर्स्ट वोट टू मोदी यावर १.०८ कोटी, नॅशन विद नमो यावर १.२० कोटी रुपये, तर नमो मर्केन्डायझिंग यावर ५.७२ लाख रुपयांच्या ४८ जाहिराती दिल्या आहेत. याशिवाय नमो सपोर्टस्ने १.९७ लाख रुपये खर्च केले आहेत. भाजपच्या राज्य शाखांही फेसबुकवरील जाहिरातींसाठी लाखो रुपये खर्च केले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यांत ३०३ जागांसाठी मतदान झाले. यासाठी भाजप आणि भाजपच्या समर्थनार्थ १६ हजारांहून अधिक जाहिराती देण्यात आल्या होत्या. याच अवधीत काँग्रेसने ५५.६८ लाख खर्च करून २२०२ आणि युवक काँग्रेसने ११४ जाहिरातींवर ६.०३ लाख रुपये खर्च केले. त्यानंतर बिजू जनता दलाचे नवीन पटनायक यांनी १६८ जाहिरातींवर ४७.२३ लाख रुपये खर्च केले. तसेच जेडीयूचे प्रशांत किशोर यांच्या आय-पॅकने ४७९ जाहिरातींवर ४६.३७ लाख रुपये करण्यात आले आहेत. तेलगू देसमने १२.९५ लाख रुपये खर्च फेसबुकवर २५ जाहिराती दिल्या. शिवसनेनेही या अवधीत ५४ जाहिरातींवर ३.१६ लाख रुपये, एनसीपीने २३५ जाहिरातींवर २.९५ लाख रुपये खर्च केले.
ट्विटर आणि इन्स्टाग्रामच्या तुलनेत फेसबुक लोकांना प्रभावित करण्यात अधिक उपयुक्त आहे, असे राजकीय आणि सोशल मीडियाच्या जाणकारांना वाटते. त्यामुळे राजकीय पक्ष फेसबुकलाच सर्वाधिक महत्त्व देत आहेत.