नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टी (भाजपा) आणीबाणी विरोधात आज देशभर काळा दिवस म्हणून पाळणार आहे. गेल्या 43 वर्षांपूर्वी म्हणजेच 25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादली होती. हा निर्णय देशातील लोकशाहीवरील घाला होता, अशी टीका करत आणीबाणी विरोधात भाजपा काळा दिवस पाळणार आहे.
आणीबाणीविरोधात लढलेल्या कार्यकर्त्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि लोकशाही मूल्यांची चर्चा करण्यासाठी भाजपाने देशभरात ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासह भाजपाचे अनेक नेते सहभाग घेणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबई भाजपाने आयोजित आणीबाणीविरोधी कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. तर अहमदाबादमध्ये आयोजित कार्यक्रमात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह संबोधित करणार आहे.
भारतात 25 जून 1975 ते 21 मार्च 1977 या 21 महिन्यांच्या कालावधीसाठी आणीबाणी लागू करण्यात आली होती. भारतीय राजकारणातील हे अतिशय नाट्यमय वळण होते. यादरम्यान, लाखो लोकांना तुरुंगात टाकण्यात आले होते तसेच माध्यमांवरही बंदी आणण्यात आली होती.