नवी दिल्ली : नागरिकत्व (संशोधन) कायद्यावरून (कॅब) विरोधकांकडून होत असलेले हल्ले आणि चुकीच्या प्रचाराला खोडून काढण्यासाठी भाजप लोकांमध्ये जागरूकता निर्माण मोहीम राबवणार आहे.या कायद्याची वैशिष्ट्ये आणि फायदे काय आहेत हे आणि हा कायदा कोणत्याही समाजाविरोधात नाही, हे या मोहिमेतून सांगितले जाईल.
पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी सांगितले की, पक्ष मोठ्या प्रमाणावर संपर्क कार्यक्रम राबवील व कायद्यासंदर्भातील साहित्य वितरित करील. या संशोधित कायद्यामुळे जवळपास दोन कोटी लोकांना भारतीय नागरिकत्व मिळेल, असा अंदाज घोष यांनी बोलून दाखवला. अनेक ठिकाणी तर ही जागरूकता मोहीम शनिवारपासूनच सुरू होत आहे.
शुक्रवारीच संसदेचे हिवाळी अधिवेशन संपले. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानात धार्मिक छळाला तोंड देत असलेले व ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत भारतात आलेले हिंदू, शीख, बुद्धिस्ट, जैन, पारशी आणि ख्रिश्चन्स आता बेकायदा स्थलांतरित मानले जाणार नाहीत, तर त्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल. भाजपचे उत्तर प्रदेश सरचिटणीस विजय बहादूर पाठक म्हणाले की, विरोधकांनी हा संशोधित कायदा कोणत्याही समाजाविरुद्ध असल्याचा चालवलेला प्रचार भाजप खोडून काढील आणि लोकांना हे सांगेल की, तीन देशांतून आलेल्या अल्पसंख्याकांना कसा लाभ होणार आहे.