दिल्ली एमसीडीवर पुन्हा एकदा आपने झेंडा रोवला आहे. महापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराचा अवघ्या ३ मतांनी पराभव झाला. काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी बहिष्कार घातल्याने अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत आपचे महेश खींची यांनी भाजपाच्या किशन लाल यांचा पराभव केला.
दिल्ली महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी गुरुवारी निवडणूक पार पडली. नगराध्यक्षपदासाठी एकूण २६५ मते पडली, त्यापैकी २ मते अवैध ठरली. खींची यांना १३३ तर लाल यांना १३० मते मिळाली. धक्कादायक म्हणजे आपच्या १० जणांनी भाजपाला मतदान केले आहे.
शैली ओबेरॉय यांच्यानंतर आता आपकडून महेश खींची हे महापौर असणार आहेत. एप्रिल 2024 मध्ये ही निवडणूक होणार होती. मात्र पीठासीन अधिकारी ठरवण्याची फाइल फाइलवर मुख्यमंत्र्यांची शिफारस नसल्याचे सांगत परत करण्यात आली होती. यामुळे विद्यमान महापौर ओबेरॉय यांनाच मुदतवाढ देण्यात आली होती. तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगात असल्याने ते फाईलवर सही करू शकले नव्हते.
आपसाठी हा दिलासा असला तरी नव्या महापौरांना अवघ्या पाच महिन्यांचाच कालावधी मिळणार आहे. दिल्ली महापालिकेत दर वर्षाला महापौर निवडणूक घ्यावी लागते. यामुळे दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर दोन महिन्यांनी महापौर निवडणूक होणार आहे. आताच्या निवडणुकीत काठावर सत्ता आल्याने आपसमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे ठाकणार आहे.
निवडणुकीदरम्यान काँग्रेसच्या 7 नगरसेवकांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. तसेच राज्यसभेच्या खासदार स्वाती मालीवाल याही अनुपस्थित होत्या.