नवी दिल्ली- मुस्लीम समुदायाला हज भेटीसाठी देण्यात येणारी सबसिडीरुपी मदत बंद करण्याचा निर्णय घेऊन एक महिना होण्याच्या आतच भाजपाने एक नवा निर्णय घेतला आहे. नागालँडमध्ये सत्तेमध्ये आल्यास ख्रिश्चनधर्मियांना जेरुसलेमची मोफत भेट घडवू असे आश्वासन भाजपाने दिल्याचे ईशान्य भारतातील वृत्तसंस्थांनी प्रसिद्ध केले आहे. मात्र ही जेरुसलेमची मोफत दौऱ्याची भेट केवळ नागालँडमधील ख्रिश्चन लोकांसाठी आहे की सर्व भारतीय ख्रिश्चनांसाठी आहे याबाबत कोणतीही माहिती स्पष्ट झालेली नाही. सध्या मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा या राज्यांच्या निवडणुकांचा प्रचार सुरु आहे. मेघालयमध्ये 75 टक्के जनता ख्रिश्चन धर्मिय आहे. नागालँडच्या एकूण लोकसंख्येपैकी 88 टक्के लोक ख्रिश्चन आहेत. ख्रिश्चन लोकांना जेरुसलेमची मोफत भेट घडवण्याचे आश्वासन दिल्याचे "वुइदनागाज" या वृत्तसंस्थेने ट्वीट केले आहे तर यूएनआय वृत्तसंस्थेने ही घोषणा नागालँडच्या ख्रिश्चन धर्मियांसाठी केल्याचे वृत्त दिले आहे. भाजपाच्या या आश्वासनावर आता चोहोबाजूंनी टीका होत आहे. भाजपा केवळ संधीसाधू आणि ढोंगी राजकारण करत असल्याची टीका समाजमाध्यमांमध्ये केली जात आहे. एआयएमआयएमचे नेते असादुद्दिन ओवेसी यांनीही भाजपाच्या या निर्णयावर टीका केली आहे.
भाजपाचे ख्रिश्चन समुदायाला जेरुसलेमच्या मोफत दौऱ्याचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2018 1:10 PM
जेरुसलेमची मोफत दौऱ्याची भेट केवळ नागालँडमधील ख्रिश्चन लोकांसाठी आहे की सर्व भारतीय ख्रिश्चनांसाठी आहे याबाबत कोणतीही माहिती स्पष्ट झालेली नाही.
ठळक मुद्देइस्रायलमधील प्रमुख वृत्तपत्र "जेरुसलेम पोस्ट"च्या संकेतस्थळानेही भाजपाच्या या प्रचाराची दखल घेतली आहे.