नवी दिल्ली - गुजरातमधील पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकींत भाजपाने निर्विवाद वर्चस्व मिळवले. मात्र, राजधानी दिल्लीतील महापालिकेच्या 5 वार्डात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाचा सुफडा साफ झाला आहे. या 5 पैकी 4 जागांवर आम आदमी पक्षाने विजय मिळवला असून एका जागेवर काँग्रेसला यश संपादन करता आले. आपच्या या विजयाबद्दल दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी आनंद व्यक्त केला असून हा मोठा विजय असल्याचं म्हटलंयय.
त्रिलोकपुरी, शालीमार बाग वार्ड, रोहिणी-C आणि कल्याणपुरी या वार्डांत आम आदमी पक्षाच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर, पूर्व दिल्लीच्या चौहान बांगड जागेवर काँग्रेसच्या उमेदवाराने बाजी मारली आहे. 28 फेब्रुवारी रोजी नगरपालिकच्या वार्डातील 5 जागांसाठी निवडणूक झाली होती. त्यामध्ये, 50 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले होते. सध्या पोटनिवडणूक झालेल्या 5 पैकी 4 जागांवर यापूर्वी आम आदमी पक्षाचेच नगरसेवक होते, तर, एका जागेवर भाजपचा नगरसेवक होता.
दरम्यान, गेल्या 15 वर्षात महापालिका निवडणुकांमध्ये यापूर्वी कधीही भाजपाचा पराभव झाला नाही. त्यामुळे, ही पोटनिवडणूक अतिशय महत्त्वाची होती. दिल्लीच्या जनतेनं 2022 च्या निवडणुकांसाठी हा संदेश दिल्याचे आम आदमी पक्षाचे महापालिका निवडणूक प्रभारी दुर्गेश पाठक यांनी म्हटलं.