भाजपचे चीनशी 'जवळचे संबंध'; 'त्या' १२ बैठकांत नेमके काय झाले : काँग्रेस
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 02:42 PM2024-05-21T14:42:00+5:302024-05-21T14:42:20+5:30
काँग्रेसचे माध्यम प्रमुख पवन खेडा यांनी म्हटले की, भाजपचे चीनशी "जवळचे संबंध" आहेत का आणि दोन्ही बाजूंमधील अनेक बैठकांचे परिणाम काय झाले आहेत, हे समोर येणे आवश्यक आहे.
नवी दिल्ली: भाजपचे चीनशी घनिष्ठ संबंध असून, २००८ पासून भाजपचे नेते आणि चिनी अधिकारी यांच्यात झालेल्या १२ उच्चस्तरीय बैठकांत नेमके काय झाले, याची माहिती द्या, अशी मागणी काँग्रेसने सोमवारी केली आहे.
काँग्रेसचे माध्यम प्रमुख पवन खेडा यांनी म्हटले की, भाजपचे चीनशी "जवळचे संबंध" आहेत का आणि दोन्ही बाजूंमधील अनेक बैठकांचे परिणाम काय झाले आहेत, हे समोर येणे आवश्यक आहे.
ते म्हणाले, जून २०२० मध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखमधील चीनच्या कारवायांसाठी क्लीन चिट दिली होती. तेव्हापासून भारतातील जनता विचारत आहे की, भाजप चीनच्या बाजूने उभे राहण्यास एवढी का घाबरत आहे?
इतक्या वेळा का भेटले? प्रत्येक बैठकीत काय झाले?, हे दोन्ही पक्ष इतक्या वेळा का भेटत होते? भाजपवाले कम्युनिस्ट पक्षाच्या शाळेत गेल्यावर त्यांना काय शिकविण्यात आले. डोकलाममध्ये सैन्यात चकमक झाली तेव्हा भाजप-आरएसएसच्या नेत्यांनी चीनच्या कम्युनिस्ट पक्षाची भेट का घेतली? आम्ही प्रत्येक बैठकीत काय झाले याची माहिती मागत आहोत, असे खेडा म्हणाले.
भाजप आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना यांच्यात जवळचे संबंध आहेत का? २००८ पासून किमान १२ बैठका झाल्या आहेत आणि भाजप नेत्यांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या अधिकाऱ्याऱ्यांची भेट घेतली आहे.
पवन खेडा, अध्यक्ष, माध्यम प्रमुख