ऑनलाइन लोकमत
गुवाहाटी, दि. ९ - आसाममध्ये कायदा व सुव्यवस्थेची समस्य निर्माण करण्याचं आणि राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं षडयंत्र भाजपा रचत असल्याचा आरोप मुख्यमंत्री तरूण गोगोई यांनी केला आहे. मोदी सरकारने दिलेली वचने पूर्ण करण्यात आलेले अपयश झाकण्यासाठी आजच्या दिसपूर घेरावचे आयोजन करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
पत्रकारांशी बोलताना गोगोई म्हणाले की, राज्यामध्ये धार्मिक तणाव निर्माण करण्याचा भाजपाचा प्रयत्न असून मंदीरामध्ये बीफ ठेवण्याचं कारस्थान रचण्यात आलं होतं अशी गुप्तचरांची माहिती आहे. कट्टरतावाद्यांना, ज्यामध्ये बंडखोर आणि जिहादी यांचा समावेश आहे, अशांना भाजपा प्रोत्साहन देत असल्याचा आरोप गोगोईंनी केला आहे.
भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, हिंदू सेना आणि अन्य संघटना कायदा व सुव्यवस्थेची समस्या निर्माण करण्यामध्ये गुंतली असल्याचे गोगोई म्हणाले. काँग्रेस येत्या महिन्यांमध्ये चांगलं काम करेल आणि भाजपाला सत्तेत येता येणार नाही या भीतीपोटी त्यांना राष्ट्रपती राजवट आणायची आहे, आणि त्यासाठीच हे षडयंत्र रचण्यात येत असल्याचा आरोप गोगोईंनी केला आहे.
भाजपाच्या राज्यपातळीवरील नेत्यांनी काँग्रेस सरकार भ्रष्टाचारी असल्याचा आरोप करत निदर्शने केली. त्यासंदर्भात गोगोईंनी आपली भूमिका पत्रकारांसमोर मांडली.