सरकार स्थापन झाल्यानंतरच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपाचा पराभव, काँग्रेसची मुसंडी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 05:26 PM2024-07-13T17:26:50+5:302024-07-13T17:28:30+5:30
Assembly Bye Election Result 2024: नवं सरकार स्थापन होऊन महिना उलटत नाही तोच सात राज्यांमधील १३ विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाला जबर धक्का बसला आहे. या निवडणुकीचे सगळे निकाल आज जाहीर झाले असून, त्यात केवळ २ ठिकाणी भाजपाला विजय मिळवता आला आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळवण्यात अपयश आलं होतं. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी एनडीएमधील मित्रपक्षांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केलं होतं. हे नवं सरकार स्थापन होऊन महिना उलटत नाही तोच सात राज्यांमधील १३ विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाला जबर धक्का बसला आहे. या निवडणुकीचे सगळे निकाल आज जाहीर झाले असून, त्यात केवळ २ ठिकाणी भाजपाला विजय मिळवता आला. तर काँग्रेसने ४ आणि इंडिया आघाडीमधील घटक पक्षांनी ६ मतदारसंघात विजय मिळवला.
निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणूक झालेल्या तेराही मतदारसंघामधील निकाल जाहीर करण्यात आला असून, त्यामध्ये बिहारमधील रुपौली मतदारसंघात अपक्ष उमेदवार शंकर सिंह हे विजयी झाले आहेत. तर हिमाचल प्रदेशमध्ये पोटनिवडणूक झालेल्या तीन पैकी दोन मतदारसंघात काँग्रेसने बाजी मारली आहे. हिमाचल प्रदेशमधील देहरा मतदारसंघातून काँग्रेसच्या कमलेश ठाकूर ह्या विजयी झाल्या आहेत. तर नलगड मतदारसंघातून काँग्रेसचे हरदीप सिंह बावा हे विजयी झाले आहेत. मात्र हमीरपूर मतदारसंघात भाजपाच्या आशिष शर्मा यांनी विजय मिळवला.
इतर राज्यांपैकी मध्य प्रदेशमधील अमरवाडा विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या कमलेश प्रताप सिंह यांनी विजय मिळवला. तर पंजाबमधील जालंधर पश्चिम मतदारसंघातून आम आदमी पक्षाच्या मोहिंदर भगत यांनी बाजी मारली. तामिळनाडूमध्ये विक्रावंडी मतदारसंघातून डीएमकेच्या ए. शिवा यांनी विजय मिळवला. उत्तराखंडमध्ये दोन जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीतही काँग्रेसने बाजी मारली. येथे बद्रिनाथ मतदारसंघात काँग्रेसचे लखपत सिंह बुटोला विजयी झाले. तर मंगलोर मतदारसंघात झालेल्या अटीतटीच्या लढाईत काँग्रेसचे काझी मोहम्मद निजामुद्दीन विजयी झाले.
पश्चिम बंगालमध्येही विधानसभेच्या ४ जागांसाठी मतदान झालं. त्यामध्ये चारही जागांवर तृणमूल काँग्रेसचा विजय झाला. राणीगंजमध्ये तृणमुलचे उमेदवार कृष्णा कल्याणी, राणीघाट दक्षिण मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचे मुकुट मणी अधिकारी, बागदा मतदारसंघात तृणमूलच्या मधुपर्णा ठाकूर आणि मणिकटला मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसच्या सृप्ती पांडे ह्या विजयी झाल्या.