- संतोष ठाकूर नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालाने भाजपच्या ‘बिहार आणि दिल्ली मिशनवर’ परिणाम होण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये भाजप आपल्या प्रभावाच्या बळावर जेडीयूवर दबाव वाढविण्याचा प्रयत्न करीत होती. दिल्लीतही आम आदमी पार्टीविरुद्ध आक्रमक मोहीम उभारण्याची तयारी सुरू होती. तथापि, महाराष्ट्र आणि हरयाणातील निवडणूक निकालानंतर या दोन्ही राज्यांसाठी भाजपला आता आपल्या रणनीतीत बदल करावा लागू शकतो. या दोन्ही राज्यांत पुढच्या वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे.
सूत्रांनुसार भाजप महाराष्ट्रप्रमाणे बिहारमध्ये मित्रपक्ष जेडीयूवर दबाव वाढविण्याच्या प्रयत्नात होती. सरकारमध्ये वरचश्मा राखण्यासाठी भाजपच्या जागा वाढवून घ्याव्यात, अशी मागणी भाजपच्या काही नेत्यांनी केली होती. त्यानंतर जेडीयूने प्रत्युत्तर देत प्रतिक्रिया दिली होती. तथापि, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने बिहारमध्ये मित्रपक्षांसोबत निवडणूक लढविली जाणार असल्याचे स्पष्ट केले होते.
परंतु जाणकारांनुसार भाजप बिहारमध्ये आपला दबदबा वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्र आणि हरयाणामधील निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर भाजप आपला हा बेत तूर्त स्थगित करून योग्य वेळेची वाट पाहणे पसंत करील. जेणेकरून अनपेक्षित निकालाला सामोरे जावे लागू नये.
भाजपसाठी सर्वात मोठे आव्हान दिल्लीत सरकार स्थापन करण्याचे आहे. दिल्ली देशाची राजधानी असून, भाजपच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचा तिथे वावर असतो. दुसरीकडे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सातत्याने भाजपला आव्हान देत असतात. दिल्ली आणि केंद्र सरकारदरम्यान सातत्याने संघर्ष होताना दिसतो.
नव्याने आखावी लागणार रणनीती
दिल्ली विधानसभेच्या आगामी निवडणुकीत केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील सरकारला सत्तेपासून दूर ठेवण्याचा भाजपचा बेत आहे; परंतु महाराष्ट्र आणि हरयाणातील निवडणूक निकालानंतर केजरीवाल सरकारचे मनोबल उंचावले आहे.भाजपच्या रणनीतीकारांनाही असे वाटते की, केजरीवाल निवडणूक प्रचारात या दोन राज्यांतील भाजपच्या स्थितीचा हवाला देत केंद्र सरकारच्या धोरणांवर हल्ला चढवतील. या पार्श्वभूमीवर दिल्लीत सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला नव्याने रणनीती आखावी लागेल.