- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : दिल्ली, पंजाब, चंदिगढ आणि हरियाणातील दोन जागांबद्दल काय निर्णय घ्यावा या द्विधा मन:स्थितीत भाजपचे नेतृत्व सापडले आहे. पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी ४०६ उमेदवारांची नावे आतापर्यंत जाहीर केली असून ३१ जागांवरील नावे मागेच ठेवली आहेत. त्यात दिल्लीतील सर्व सात, पंजाबमधील १३ पैकी तीन आणि चंदिगढमधील एकमेव व हरियाणातील दोन जागांचा समावेश आहे.
काहीच दिवसांपूर्वी भाजपमध्ये दाखल झालेले क्रिकेटपटू गौतम गंभीर यांना नवी दिल्ली मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. पक्षाच्या काही धोरणांवरून उदित राज हे काळजीचा सूर आळवत आहेत. राज यांना मोठा गाजावाजा करून आणले गेले. परंतु, मतदारसंघातील त्यांची कामगिरी काळजीचा विषय ठरली आहे. तिसरा बळी हा महेश गिरी यांचा असू शकेल. गिरी यांच्या मतदारसंघात केंद्रीय कॅबिनेट मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना कदाचित पाठवले जाईल आणि काँग्रेस आणि आम आदमी पक्षाची (आप) आघाडी झाली तर काँग्रेसचे कपिल सिबल हे विरोधकांचे एकत्रित उमेदवार असू शकतील त्या चांदणी चौक मतदारसंघात नवा चेहरा दिला जाऊ शकतो. मोदी यांची लाट असल्याचा दावा आणि विद्यमान खासदारांबद्दलची नाराजी असल्यामुळे नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची इच्छा असलेले भाजपचे नेतृत्व कमालीचे काळजीत पडले आहे. काँग्रेस-आपची आघाडी झाल्यास ती भाजपला तोंड देण्यास सक्षम आहे. कारण मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे समाजातील गरीब वर्गात चांगले वजन आहे.
दिल्लीतील तीन जागांच्या बदल्यात हरियाणा, पंजाब आणि गोव्यातील जागा काँग्रेसकडून मान्य करून घेण्यातील केजरीवाल यांच्या कौशल्यामुळे भाजपच्या उमेदवारांची नावे जाहीर होण्यात विलंब होत आहे. भाजपमधील अनेकांना पक्षाचा हा दुबळेपणा असल्याचे व त्यामुळे चुकीचे संकेत जात असल्याचे वाटते. येत्या ४८ तासांत भाजप हरियाणा, पंजाब व दिल्लीतील उर्वरित जागांसाठीच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्याची शक्यता आहे. रोहटकमध्ये उमेदवार जाट द्यावा की नाही याचा निर्णय भाजपच्या नेतृत्वाचा अजून होत नाही, असे समजते. हुड्डा यांच्याविरुद्ध जाटेतर समाज असल्यामुळे येथून जाट उमेदवार नको, असे मनोहरलाल खट्टर यांना वाटते. २०१४ मध्ये मोदी यांची भरभक्कम लाट असतानाही भाजपला हरियाणात रोहटकसह तीन जागा जिंकण्यात अपयश आले होते.तीन खासदारांना घरचा रस्ता दाखवणार?दिल्लीतील विद्यमान सातपैकी काही खासदारांबद्दल तीव्र नाराजी असल्यामुळे नेतृत्वाला मोठी शस्त्रक्रिया करायची इच्छा आहे. भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लोकसभेच्या विद्यमान तीन खासदारांपैकी किमान तिघांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल व त्यात नवी दिल्लीतील मीनाक्षी लेखी, उदित राज (वायव्य) आणि महेश गिरी (पूर्व) यांचा समावेश आहे.