नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या चौकीदार या प्रतिमेला देशपातळीवरील स्थानिक वर्गाशी जोडले आहे. केवळ मी एकटाच चौकीदार नाही, भ्रष्टाचाराची लढाई लढणारा, सामाजिक गुन्हेगारीशी लढणारा आणि वाईट प्रवृत्तींवर नजर ठेवणार प्रत्येक भारतीय चौकीदार असल्याचं मोदींनी म्हटले आहे. तसेच, देशाच्या विकासासाठी कष्ट करणारा प्रत्येकजण चौकीदार असल्याचं भाजपाने म्हटले आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन व्हिडीओ शेअर केला आहे.
देशाच्या प्रगतीसाठी काम करणारा प्रत्येक भारतीय नागरिक चौकीदार आहे. त्यामुळेच, आज प्रत्येक भारतीय मै भी चौकीदार असल्याचं सांगतो, असे म्हणत मोदींनी भाजपाच्या निवडणूकपूर्व कॅम्पेनचे लाँचिंग केले आहे. मै भी चौकीदार हे घोषवाक्य घेऊन हे कॅम्पेन चालविण्यात येणार आहे. भाजपाच्या या कॅम्पेन व्हिडीओत, देशाच्या विविध भागातील व्यक्तींना दर्शविण्यात आले असून 'मै भी चौकीदार हूँ' असे या भारतीयांकडून बोलण्यात येत आहे. झूठ के कपाल पर सत्य का प्रहार हूँ, असे म्हणत गाण्यातील एका कडव्यातून खोटं बोलणाऱ्यांवर टीका करण्यात आली आहे.
दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी चौकीदार ही चोर है, असे म्हणत मोदींवर प्रहार केला होता. मात्र, मोदींनी प्रत्येक भारतीय चौकीदार असल्याचे सांगत पुन्हा एकदा स्वत:च्या चौकीदार या प्रतिमेला स्थानिक पातळीवरील जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे या अभियानाद्वारे केवळ मोदीच नाहीत, तर प्रत्येक भारतीय चौकीदार असल्याचं भाजपाने म्हटलं आहे.