नितीन अग्रवाल, नवी दिल्लीमोदी सरकारची कामगिरी लोकांपर्यंत पोहोचवत जनाधार भक्कम करण्यासाठी भाजपा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून आलेल्या पूर्णवेळ सदस्यांवर निवडणुकीत विशेष जबाबदारी सोपविणार आहे. संघाची पार्श्वभूमी असलेले प्रभावशाली नेते लोकांना प्रभावित करणाऱ्या लोकांची निवड करून पक्षासाठी मताधार तयार करण्याचे काम करतील.सूत्रांनुसार पक्षाचे संघटक समाजाला दिग्दर्शन करणारे डॉक्टर, वकील, शिक्षक यासारख्या प्रभावी लोकांच्या माध्यमातून काम करतील. समाजातील विविध स्तरांतील लोकांशी याचा संपर्क असतो. ते जे सांगतात, त्याचे अनुसरणही जनता करते. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा, गुजरात आणि कर्नाटकात होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजप कामाला लागला आहे.उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि कर्नाटकात पुन्हा सत्ता मिळविण्याचा, तर अन्य राज्यांतील सत्ता टिकविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. सर्व राज्यांत मोदी सरकारच्या कामगिरीवर मते मिळविण्याचा भाजपचा इरादा आहे; परंतु आजवरच्या कार्यक्रमातून यात यश मिळाल्याचे दिसत नाही. पक्ष आणि संघाच्या वरिष्ठ नेत्यांचेही याबाबतीत पुरेसे समाधान झालेले नाही. त्या पार्श्वभूमीवर मागील चार दिवस दिल्लीलगत सूरजकुंड येथे भाजप आणि संघाचे प्रमुख नेते विचारमंथनासाठी जमले होते.विविध राज्यांतून संघटन सचिवांशिवाय या बैठकीत भाजप अध्यक्ष अमित शहा, डॉ. कृष्णगोपाल (भाजप-संघ समन्वयक) सरचिटणीस रामलाल, जम्मू-काश्मीरचे प्रभारी राममाधव यांचा सहभाग होता. या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती पंतप्रधान मोदी यांना देण्यात आली आहे. प्रत्येक राज्यात पक्ष संघटन मजबूत करण्यासह सरकारच्या कामगिरीवर चर्चा करण्यात आली. याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बदललेली प्रतिमा आणि जागतिक स्तरावर भारताचे वाढलेले महत्त्व याची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या धोरणांवरही चर्चा झाली. आगामी विधानसभा निवडणुकीत जागतिक पातळीवरील सरकारची कामगिरी आणि विविध देशांत अडकलेल्या भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
संघाच्या पूर्णवेळ सदस्यांवर भाजपाची निवडणूक जबाबदारी
By admin | Published: September 15, 2016 2:49 AM