रामपूर (उ. प्र.) : २००९च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या जमावबंदी आदेशाचा भंग केल्याबद्दल येथील न्यायालयाने बुधवारी ‘भाजपा’चा मुस्लीम चेहरा असलेले केंद्रीय राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांना एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. नक्वी आणि भाजपाला हा हलकासा धक्का असला, तरी लगेच जामिनावर सुटका झाल्याने नक्वी यांना राजीनामा देण्याची नौबत येणार नाही.प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मनीष कुमार यांनी नक्वी यांच्याखेरीज भाजपाच्या आणखी १८ कार्यकर्त्यांनाही तुरुंगवासाच्या शिक्षा ठोठावल्या. शिक्षा सुनावल्यानंतर न्यायालयात हजर असलेल्या नक्वी यांना अल्पकाळ न्यायालयीन कोठडीत घेण्यात आले. पण लगेचच त्यांची वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली. नक्वी यांच्या शिक्षेचे वृत्त येताच काँग्रेससह विरोधी पक्षांनी लगेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पण भाजपाने ती फेटाळत या निकालाविरुद्ध वरिष्ठ न्यायालयात अपील केले जाईल, असे सांगितले. (वृत्तसंस्था)> आदेश झुगारून काढला होता मोर्चा २००९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात रामपूर मतदारसंघात जिल्हा प्रशासनाने जमावबंदी आदेश जारी केला होता. रामपूर जिल्हा भाजपाच्या अध्यक्षांना अटक करून पक्षाचे प्रचाराचे वाहन जप्त केले गेल्याच्या निषेधार्थ नक्वी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कार्यकर्त्यांनी जमावबंदी आदेश झुगारून मोर्चा काढला आणि पटवाई पोलीस ठाण्याचा घेराव केला, असा आरोप होता. या प्रकरणी पोलिसांनी सुमारे २०० लोकांवर गुन्हा नोंदविला होता.
भाजपाची फजिती
By admin | Published: January 15, 2015 5:49 AM