ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३१ - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सेल्फी ट्रेंड सर्वत्र लोकप्रिय असून ते देशोदेशींच्या दौ-यादरम्यान तसेच अनेक मोठ्या लोकांसोबतचे आपले 'सेल्फी' वेळोवेळी सोशल नेटवर्किंग साईट्सवर अपलोड करत असतात. मात्र दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान चालवण्यात आलेल्या 'सेल्फी विथ मोदी' या कॅम्पेनमुळे मोदी आणि भाजपाला काहीही फायदा न होता उलट नुकसानच अधिक झाल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीत विधानसभेत 'आप'समोर भाजपाचा काही टिकाव तर लागला नाहीच आणि 'सेल्फी विथ मोदी' या कॅम्पेनसाठी पक्षाला एक कोटीहून अधिक रुपये खर्चावे लागल्याने तिजोरीतही खडखडाट झाला. एवढ्या महत्वाकांक्षी कॅम्पेनची अशी धूळधाण उडाल्यानेच बिहार निवडणुकीत भाजपाने या कॅम्पेनचा विचारही मनात आणला नाही. दिल्ली निवडणुकीसाठी झालेल्या खर्चाचा अहवाल भाजपाने निवडणूक आयोगासमोर सादर केला असून त्यातूनच ही माहिती उघड झाली आहे.
यावर्षीच्या सुरूवातीस फेब्रुवारीमध्ये दिल्लीत पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी भाजपाने कंबर कसून तयारी केली होती, लोकसभा निवडणुकीदरम्यमान उसळलेल्या मोदी लाटेचा फायदा घेऊन दिल्ली काबीज करण्याचा भाजपाचा मनसुबा होता. त्यासाठी त्यांनी 'सेल्फी विथ मोदी' हे कॅम्पेन सुरू केले आणि 'पंतप्रधान मोदींच्या व्हर्च्युअल इमेजसोबत लोकांना सेल्फी काढता यावी यासाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्रात सेल्फी बूथ बसवण्यात आले होते. मात्र या कॅम्पेनच्या पहिल्याच राऊंडमध्ये भाजपाला तब्बल ८६ लाखांचा खर्च आला आणि कॅम्पेनचे सातही टप्पे पार पडेपर्यंत हा खर्च एक कोटी रुपयांपेक्षा अधिक झाला. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करूनही भाजपाला दिल्लीत अपेक्षित यश न मिळाल्याने बिहार निवडणुकीत अशी चूक न करण्याचा निर्धार करून भाजपाने आपले संपूर्ण लक्ष विकासाच्या मुद्यावर केंद्रित केल्याचे दिसत आहे.