गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पहिल्या टप्प्याला आता काही तासांचा अवधी राहिलाय. 22 वर्षांपासून गुजरातचा राज्यछकट हाकत असलेल्या भाजपाविरोधात जीएसटी, नोटाबंदीमुळे मतदारांमध्ये असलेली नाराजी, पाटीदार आंदोलकांमुळे भाजपाविरोधात तयार झालेली हवा आणि राहुल गांधींच्या झंझावाती प्रचारसभा यामुळे काँग्रेसला गुजरातेत अनुकूल वातावरण तयार झाले आहे. पाटीदार नेता हार्दिक पटेल, ओबीसी नेता अल्पेश ठाकोर, दलितांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा जिग्नेश मेवाणी यांच्यामुळे काँग्रेसला बळ मिळत आहे. विशेषतः हार्दिक पटेलांच्या झंझावाती प्रचाराला प्रत्युत्तर देणे भाजपाला अवघड झाले आहे. या तरुण नेत्यांविरोधातील भाजपाची प्रत्येक रणनीती अपयशी ठरत आहे. त्यातच गुजरातमधील पारंपरिक मतदार दूर जात असल्याचे विविध सर्व्हेक्षणांमधून समोर येत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गृहराज्यात भाजपाचा पाय खोलात जाताना दिसत आहे. खरंतर गुजरात हा भाजपाचा बालेकिल्ला. गेल्या 22 वर्षांपासून गुजरातमध्ये भाजपाला मतदारांनी भक्कम साथ दिली आहे. विधानसभा असो वा लोकसभा गेल्या 22 वर्षांत प्रत्येक निवडणुकीत भाजपाला विजय मिळत आलाय. पण नोटाबंदी आणि जीएसटीसारख्या व्यापारी वर्गाला अडचणीत आणणाऱ्या निर्णयांमुळे व्यापारी वर्गाचा भरणा असलेल्या भाजपाविरोधी वातावरण निर्माण झाले. त्यातच पाटीदार आंदोलनामुळे राज्यातील भाजपाविरोधाला व्यापक स्वरूप आले आहे. राज्यात दलितांवर वाढलेले अत्याचार आणि ओबीसींच्या समस्या यामुळे आतापर्यंत हिंदुत्वाच्या व्यापक छत्राखाली एकत्र येणाऱ्या गुजराती समाजात जातीय प्रश्नांनी गंभीर रूप धारण केले. त्यातच या जातींना हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर, जिग्नेश मेवाणी असे युवा नेतृत्व लाभल्याने असंतोषाला भाजपाविरोधाची दिशा मिळाली आहे. तसेच शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर झाल्याने ग्रामीण भागात भाजपाविरोधात तीव्र नाराजी आहे. आतापर्यंत गुजरातची निवडणूक म्हटली की भाजपाचा विजय निश्चित मानला जायचा. पण यंदा मात्र वेगळेच चित्र दिसत आहे. गुजराती मतदार खुलेपणाने भाजपाविरोधात बोलत आहे. सोशल मीडियावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार टीका होत आहे. नुकत्याच आलेल्या ओपिनियन पोल्समधून गुजराती मतदार भाजपापासून दूर जात असल्याचा कल नमूद करण्यात आला आहे. त्यामुळे खुद्द भाजपाचे नेते आणि कार्यकर्त्यांच्याच मनात धाकधुक निर्माण झाली आहे. पण असे असले तरी भाजपाविरोधात असलेला असंतोष काँग्रेस मतांमध्ये परिवर्तित करेल का याबाबत शंका आहे. काँग्रेसच्या प्रचारामध्ये जोर असला तरी मतदाराला मतदान केंद्रापर्यंत आणून भाजपाविरोधात मतदान करण्यास प्रवृत्त करेल अशी यंत्रणा त्यांच्याकडे नाही. पाटीदार आणि इतर समाजघटकांमधून व्यक्त होणाऱ्या नाराजीचा लाभ आपल्याला होईल आणि त्यातून आपण भाजपाला पराभूत करू शकू या गृहितकावर काँग्रेसचे गणित अवलंबून आहे. मात्र निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून फ्रंटफूटवर असलेल्या काँग्रेसला मणिशंकर अय्यर यांनी केलेल्या विधानांमुळे काहीसे अडचणीत यावे लागले होते. अय्यर यांनी मोदींचा नीच अशा केलेल्या उल्लेखाचा पुरेपूर लाभ उठवण्याचा प्रयत्न भाजपाने केला आहे. त्यामुळे विकास पागल झाला आहे या घोषणेने सुरू झालेला गुजरातमधील प्रचार विचाराच्या मुद्द्यावरून उतरून वैयक्तिक चिखलफेकीपर्यंत आला आहे. दुसरीकडे भाजपाचे प्रत्येक मतदाराशी संपर्क साधणारे पन्नाप्रमुख, भक्कम यंत्रणा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा आणि सर्वात महत्त्वाचा असा भाजपाचा हक्काचा मतदार यांमुळे भारतीय जनता पक्ष अटीतटीच्या लढाईत गुजरातमधील आपले सिंहासन निसटत्या फरकाने राखण्याची शक्यता आहे. मात्र मतदाराने आपल्या कलाबाबत अनिच्छित वातावरण कायम ठेवलेले असल्याने 14 डिसेंबरपर्यंत भाजपाच्या नेत्यांची पुरती दमछाक होणार आहे.
गुजरातमध्ये भाजपाचा पाय खोलात! पण...
By balkrishna.parab | Updated: December 8, 2017 22:27 IST