भाजपाचं गुजरात मॉडल... मराठी खासदाराने फोटो शेअर करत साधला मोदींवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 09:16 AM2020-08-27T09:16:13+5:302020-08-27T09:18:28+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना राज्याचा चांगला विकास केल्याचं चित्र निर्माण करण्यात आलं होतं. गुजरात मॉडलचा दाखला देत भाजपाने नरेंद्र मोदींना प्रमोट केलं, त्याच धर्तीवर भाजपाप्रणित आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींना घषितही केले.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनीगुजरात मॉडलचं ब्रँडींग करत 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाची सत्ता खेचून आणली. याच मॉडेलच्या आधार घेत गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान बनले. त्यामुळे, गुजरात मॉडलवरुन मोदींना सातत्याने काँग्रेस आणि विरोधी पक्षांकडून लक्ष्य करण्यात येते. राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या प्रादुर्भावावरुन गुजरात मॉडलचा उल्लेख करत टीका केली होती. आता, पावसाळ्यात गुजरातमधील रस्त्यांची दूरवस्था पाहून गुजरातचे काँग्रेस प्रभारी आणि खासदार राजीव सातव यांनी मोदी सरकारला टार्गेट केलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना राज्याचा चांगला विकास केल्याचं चित्र निर्माण करण्यात आलं होतं. गुजरात मॉडलचा दाखला देत भाजपाने नरेंद्र मोदींना प्रमोट केलं, त्याच धर्तीवर भाजपाप्रणित आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींना घषितही केले. याच, गुजरात मॉडलचा आधार घेऊन प्रचार आणि प्रसार करण्यात आला. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही मोदींच्या गुजरात मॉडेलचे जाहीर सभांमधून कौतुक केले होते. तेथील रस्ते, पथदिवे, नागरी सुविधांचा मोठ्या प्रमाणात ढोल पिटण्यात आला होता. मात्र, हे गुजरात मॉडल मला भासविण्यात आल्याचंही राज यांनी नंतर स्पष्ट केलं. आता, काँग्रेस खासदार राजीव सातव यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर करत 'भाजपा का गुजरात मॉडल', असं कॅप्शन दिलंय.
राजीव सातव यांच्या या ट्विटवर अनेकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यापैकी, काहींनी सातव यांना घरचा रस्ता दाखवला आहे, म्हणजेच तुमच्या मतदारसंघातील रस्ते पाहा, असा सल्लाही दिलाय. काहींनी महाराष्ट्र मॉडल पाहा, अशाही सूचना केल्या आहेत. तर, काहींनी राजीव सातव यांच्या फोटोला अनुसरुन गुजरात मॉडल फसवे असल्याचंही म्हटलंय.
भाजपा का गुजरात मॉडल pic.twitter.com/nD9pEFiKzK
— Rajeev Satav (@SATAVRAJEEV) August 26, 2020
राहुल गांधींनीही केली होती टीका
देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रातील मोदी सरकार आणि गुजरात मॉडेलवर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला होता. देशभरातील इतर राज्यांच्या तुलनेत कोरोना संसर्गामुळे होणारा मृत्यूदर हा गुजरात राज्यात सर्वाधिक आहे. त्यामुळे इतर राज्यांशी तुलना करत ‘गुजरात मॉडेल’ फेल गेल्याचे राहुल गांधींनी म्हटले. गुजरात राज्यातील तुलना काँग्रेस शासित राज्यांशी करत राहुल गांधी यांनी यासंदर्भात ट्विट केले होते. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यूदर गुजरातमध्ये 6.25, महाराष्ट्र 3.73%, राजस्थान 2.32%, पंजाब 2.17%, पुडुचेरी 1.98%, झारखंड 0.5% आणि छत्तीसगढ 0.35% इतका आहे''. त्यामुळे या आकडेवारीकडे पाहता कोरोना संकटापुढे 'गुजरात मॉडेल' अयशस्वी झाल्याचे दिसत होते.