नवी दिल्ली - आशिया खंडातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून उदयास आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या हातून देशातील एक-एक राज्य निसटून जात आहे. आधी छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यांच्या पाठोपाठ महाराष्ट्र, झारखंड आणि आता दिल्लीही भाजपच्या हातून गेली आहे. त्यामुळे देशात सर्वाधिक सदस्य असलेल्या भाजपचा वाईट काळ सुरू झाला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दिल्लीत तर भाजपच्या निम्या सदस्यांनी विधानसभा निवडणुकीत 'आप'ला प्राधान्य दिल्याचे दिसून आले आहे.
मागील सहा वर्षांच्या काळात भाजपने देशात संघटन मजबूत केले आहे. बुथ लेव्हलपासून नियोजन असणाऱ्या भाजपच्या सदस्य नोंदणीचा आकडा कोट्यवधीच्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे निवडणूक प्रचारात भाजपची यंत्रणा इतर पक्षांच्या तुलनेत आघाडीवर असते. दिल्ली विधानसभा निवडणुकीतही भाजपचे नियोजन शिस्तबद्ध होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपशासित राज्यातील आजी-माजी मुख्यमंत्र्यांनी देखील दिल्लीत भाजपचा प्रचार केला होता. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही.
दिल्लीत भाजपची सदस्य संख्या 62.28 लाख एवढी आहे. खुद्द भाजपनेच हा दावा केला होता. त्यामुळे भाजपला ही निवडणूक जिंकणे काहीही कठिण नसल्याचे दिसत होते. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत भाजपला केवळ 35 लाख 66 हजार मते मिळाली आहे. भाजपचा सदस्य नोंदणीचा दावा खरा असेल तर निम्म्या भाजप सदस्यांनी 'आप'ला मतदान केले हे स्पष्ट होते.
काँग्रेसचीही निम्मी मते 'आप'लाचदिल्लीत काँग्रेसचे 7 लाख सदस्य असल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी केला होता. त्यामुळे काँग्रेसला निवडणुकीत काही प्रमाणात यश मिळेल असा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात काँग्रेसला देखील केवळ साडेतीन लाख मते मिळाली आहे. अर्थात अर्धी मते आपच्याच खात्यात गेल्याचे दिसून येत आहे.