इंफाळ - बिहारमध्ये भाजपासोबतची युती तुटल्यानंतर मणिपूरमध्येही नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडचे आमदार सरकारला असलेला पाठिंबा काढून घेणार असल्याची चर्चा होती. मात्र प्रत्यक्षात राज्यातील जेडीयूच्या ६ पैकी पाच आमदारांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. ६ पैकी ५ आमदारांनी पक्ष सोडल्याने हा नितीश कुमार यांना मोठा धक्का मानला जात आहे.
विधानसभेच्या सचिवांनी या संदर्भामध्ये एक नोटिफिकेशन प्रसिद्ध करून विधानसभेच्या सर्व सदस्यांना याची माहिती दिली आहे. नोटिफिकेशनमध्ये सांगितले की, भारतीय राज्यघटनेच्या दहाव्या शेड्युल अन्वये हे पाच आमदार आता भाजपाचे सदस्य असतील.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे आमदार बिहारमध्ये जेडीयूने एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने नाराज होते. नितीश कुमार यांनी मणिपूरमधील भाजपा सरकारला असलेला पाठिंबा काढून घेण्याचे संकेत दिल्यानंतर हे आमदार पक्ष सोडून भाजपामध्ये दाखल झाले आहेत.
नितीश कुमार २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये स्वत:ला पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून पुढे आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी भाजपाशी असलेली युती मोडून आरजेडीसोबत महाआघाडीत सामील होऊन नव्याने सरकार स्थापन केले होते.