जम्मू काश्मीर पाठोपाठ हरियाणातही भाजपामध्ये बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. काल भाजपाने मुख्यमंत्री सैनी यांच्यासह ६७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. आज त्याचे पडसाद उमटू लागले असून भाजपा खासदाराच्या आईनेच तिकीट न मिळाल्याने बंडाचे निशान फडकावले आहे. भाजपाने तिकीट नाही दिले तरी मी निवडणूक लढविणार असल्याचे या माजी महिला मंत्र्याने आव्हान दिल्याने भाजपात खळबळ उडाली आहे.
याचबरोबर भाजपाने वीज मंत्र्याचेही तिकीट कापले आहे. यामुळे या मंत्र्यानेही भाजपनिरोधी सूर आळवण्यास सुरुवा केली असून माजी मंत्री सावित्री जिंदल आणि मंत्री रणजीत चौटाला यांच्या या निर्णयामुळे भाजपाला मोठा झटका बसणार असल्याचे बोलले जात आहे. सावित्री जिंदल यांचे बडे प्रस्थ आहे. त्या एक प्रभावशाली नेता आहेत. त्यांचा मुलगा नवीन जिंदल हे खासदार आहेत.
भाजपमधील नाराजी एवढ्यावरच थांबलेली नसून माजी खासदार सुनिता दुग्गल यांना तिकीट दिल्याने विद्यमान आमदार लक्ष्मण नापा यांनी भाजपाला रामराम केला आहे. बुधवारी रात्री उशिरा त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष मोहनलाल बडोली यांना राजीनामा पाठविला आहे. दुग्गल काही दिवसांपासून रतिया भागात सक्रीय झाल्या होत्या. त्यांना तिकीट मिळाल्याचे कार्यकर्त्यांना समजताच पक्षात निषेधाचे सूर उमटू लागले आहेत. स्थानिकालाच उमेदवारी देण्याची मागणी केली जात आहे. अनेक गावांच्या सरपंचांनीही तसे पत्र लिहिले होते. भाजपचा राजीनामा दिल्यानंतर लक्ष्मण नापा काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे.
सैनींचा मतदारसंघ बदलला...सैनी हे मुख्यमंत्री होण्यापूर्वी कर्नाल लोकसभा मतदार संघातून खासदार होते. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना पदाचा राजीनामा द्यायला लावला होता. कर्नाल विधानसभा मतदारसंघातून ते आमदार होते. पोटनिवडणुकीत सैनी कर्नालमधून आमदार झाले. परंतू, यावेळी भाजपाने सैनींना कर्नालऐवजी लाडवामधून तिकीट दिले आहे.