मुंबई - आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम किंवा सेमीफायनल म्हणून ५ राज्यांतील निवडणुकांकडे देशाचे लक्ष लागले आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोरममध्ये विधानसभा निवडणुकांसाठी मतदान झाले. त्यापैकी, ४ राज्यांमध्ये आज निकाल जाहीर होत आहे. मिझोरम वगळता निकाल हाती येत असलेल्या चारपैकी तीन राज्यात भाजपाने आघाडी घेतल्याने सेमीफायनलच्या सामन्यात भाजपाने धुव्वादार बॅटींग केल्याचं दिसून येत आहे. तर, सत्ताधारी छत्तीसगडमध्येही यंदा काँग्रेसची विकेट पडणार असल्याचं चित्र आहे.
मध्य प्रदेशमध्ये भाजपाने मोठी मुसंडी मारली असून भाजपाने १५० पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेत येथील विजय निश्चित केला आहे. तर, राजस्थानमध्ये सुरुवातीला काँग्रेसने आघाडी घेतली होती. मात्र, काही वेळातच हे चित्र बदलले असून बाजपाने ११० पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे, राजस्थानमध्येही पायलट व गेहलोत यांचे विमान हेलकावे खात असल्याचं दिसून येतं. विशेष म्हणजे छत्तीसकडमध्ये काँग्रेसचं सरकार असून तिथे काँग्रेस सत्ता राखेल असा अंदाज होता. अनेक एक्झिट पोलमधूनही छत्तीसगडमध्ये काँग्रेसला बहुमत दिसून आले. मात्र, दुपारची आकडेवारी पाहिल्यानंतर येथेही भाजपाचे कमळ खुलल्याचं दिसून येत आहे.
छत्तीसगडमध्ये दुपारी १२ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार भाजपने ५० पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली आहे. येथील विधानसभेच्या ९० जागांसाठी निवडणूक पार पडली. त्यामध्ये, काँग्रेस ३४ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपाची धुव्वादार बॅटींग पाहायला मिळत आहे. तर, तेलंगणात बीआरएसला सत्तेतून खाली खेचण्यात काँग्रेसची सरशी होत असल्याचं दिसून येतं. काँग्रेसने तेलंगणात ६० पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेतली असून बीआरएस ३५ पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेऊन आहे. येथे काँग्रेस समर्थकांनी जल्लोष सुरू केला असून विजयी झाल्याच्या आनंदात लाडूवाटपही केले.
दरम्यान, एकंदरीत ४ राज्यांच्या निवडणूक निकालात भाजपाला घवघवीत यश मिळाल्याचे दिसून येत आहे. लोकसभेची सेमी फायनल ठरलेल्या या निवडणुकीत भाजपाने धुव्वादार बॅटींग करत आघाडी मिळवली आहे. तर, तीन राज्यात काँग्रेसची विकेट पडल्याचं चित्र आहे. तेलंगणात भाजपला एकहाती सत्ता मिळत नसली तर, भाजपाने १ जागेवरुन थेट ८ ते १० जागांपर्यंत आघाडी घेतल्याचं चित्र आहे. त्यामुळे, लोकसभेच्या सेमीफायनलमध्ये काँग्रेसची कोंडी झाल्याचं दिसत आहे.
निवडणूक निकाल अपडेट पाहा -