नवी दिल्ली : पैसा व बळाचा खुलेआम वापर करून सरकारे पाडणे हे भाजपाचे सत्तेवर येण्याचे नवे मॉडेल बनलेले आहे. उत्तराखंडमधील राजकीय संकटामुळे मोदींच्या भाजपाचा खरा चेहरा उघड झाला आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधला.उत्तराखंडमधील राजकीय संकटावरून भाजपाला लक्ष्य करण्यासाठी राहुल गांधी यांनी टिष्ट्वटरचा वापर केला. भाजपाच्या अशा झुंडशाहीला काँग्रेस लोकशाही मार्गानेच उत्तर देईल, असे राहुल गांधी यांनी जाहीर केले. ‘बिहारमध्ये पराभव झाल्यानंतर घोडेबाजार आणि धन-बलाचा खुलेआम वापर करून निर्वाचित सरकारे पाडणे हे भाजपाचे नवे तंत्र बनले आहे असे दिसते. परंतु लोकशाही आणि संविधानावरील हा हल्ला आम्ही सहन करणार नाही आणि काँग्रेस पक्ष या भाजपाच्या तंत्राविरुद्ध लढा देईल. भाजपाने आधी अरुणाचल प्रदेशमध्ये हा खेळ खेळला आणि आता उत्तराखंडमध्ये तोच खेळ खेळत आहे. यातून मोदींच्या भाजपाचा खरा चेहरा उघड झाला आहे,’ असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.दोन दिवसांपूर्वी उत्तराखंडमधील काँग्रेसच्या नऊ आमदारांनी बंडाचे निशाण फडकविल्यामुळे तेथील हरीश रावत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार संकटात सापडले आहे. हे बंडखोर आमदार भाजपाला जाऊन मिळाले आहेत आणि भाजपाने या बंडखोरांच्या पाठिंब्यावर राज्यात आपले सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. रावत सरकार अल्पमतात आले आहे आणि आपल्याजवळ ३६ आमदार आहेत, असेही भाजपाने म्हटले आहे. तथापि आपल्याला अद्यापही ३५ आमदारांचा पाठिंबा असल्याचा आणि अन्य पाच बंडखोर आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा रावत यांनी केला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सत्तेसाठी भाजपाचे ‘घोडाबाजार मॉडेल’!
By admin | Published: March 21, 2016 3:31 AM