कमलनाथ यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे चर्चेत आलेल्या इमरती देवी यांना मतदारांनी दिला असा कौल
By बाळकृष्ण परब | Published: November 11, 2020 08:18 AM2020-11-11T08:18:55+5:302020-11-11T08:21:51+5:30
Madhya Pradesh by-election News : बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीप्रमाणेच मध्य प्रदेशमधील विधानसभा पोटनिवडणुकीकड़ेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.
भोपाळ - बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीप्रमाणेच मध्य प्रदेशमधील विधानसभा पोटनिवडणुकीकड़ेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत भाजपाने १९ जागा जिंकत राज्यातील आपले सरकार भक्कम केले आहे. मात्र या निवडणुकीत सर्वात लक्षवेधी लढत ठरलेल्या डबरा विधानसभा मतदारसंघात मात्र भाजपाच्या विरोधात मतदारांनी कौल दिला आहे. डबरा मतदारसंघात भाजपाकडून इमरती देवी निवडणूक लढवत होत्या. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी इमरती देवी यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे मोठा वाद झाला होता. मात्र या वादानंतरही मतदारांची सहानूभूती इमरती देवी यांना मिळू शकली नाही.
इमरती देवी यांना त्यांचे व्याही सुरेश राजे यांनी पराभूत केले. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडल्यानंतर त्यांच्या कट्टर समर्थक असलेल्या इमरती देवी यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. दरम्यान, आमदारकीचा राजीनामा देऊन पोटनिवडणुकीसाठी मैदानात उतरलेल्या इमरती देवी यांच्याविरोधात काँग्रेसने त्यांचे व्याही सुरेश राजे यांना मैदानात उतरवले होते. या सुरेश राजेंच्या प्रचारासाठी आले असताना कमलनाथ यांनी भाषणादरम्यान, इमरती देवी यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र प्रत्यक्ष मतदानामध्ये या वादाचा मतदारांवर प्रभाव पडल्याचे दिसून आले नाही.
डबरा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या इमरती देवी यांना ६८ हजार ५६ मते मिळाली. तर काँग्रेसच्या सुरेश राजे यांना ७५ हजार ६८९ मते मिळाली. अशा प्रकारे सुरेश राजे यांनी इमरती देवी यांना ७ हजार ६३३ मतांनी पराभूत केले. इमरती देवी शिवराज सिंह चौहान सरकारमध्ये मंत्री होत्या. मात्र पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवामुळे त्यांना आता आपले मंत्रिपद सोडावे लागणार आहे.
दरम्यान, मध्य प्रदेशच्या पोटनिवडणुकीत मात्र भाजपाचा बोलबाला दिसून आला. राज्यात २८ मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाने १९ जागांवर विजय मिळवला. ज्योतिरादित्य शिंदे यांनी अखेर आपली मध्यप्रदेशातील ताकद सिद्ध केली असून, पोटनिवडणुकीत २८ पैकी १९ जागा जिंकण्यात भाजपाला यश आले आहे. त्यामुळे भाजपच्या सत्तेला धक्काही लागणार नाही. सात महिन्यांपूर्वी ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश केल्याने तत्कालीन कमलनाथ यांचे काँग्रेसचे सरकार अल्पमतात आले होते.
२५ बंडखोरांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता तर तीन आमदारांचे निधन झाल्याने रिक्त झालेल्या २८ जागांवर पोटनिवडणुका घेण्यात आल्या. एक्झिट पोलमध्ये भाजपला पोटनिवडणुकीत १६ ते १८ तर काँग्रेसला १० ते १२ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण पोलमध्ये दिलेल्या कलपेक्षाही अधिक जागा मिळवून भाजपने मध्यप्रदेशवर सत्ता कायम ठेवली आहे.
भाजपने १९ जागांवर तर काँग्रेसने ९ जागांवर विजय मिळवला आहे. सुरुवातीला एका जागेवर बहुजन समाज पार्टीचा उमेदवार पुढे होता परंतु नंतर तो मागे पडला. या निकालातून शिवराजसिंग चौहान यांच्या सरकारचे भवितव्य ठरणार होते. एकूण २२९ सदस्यसंख्या असलेल्या विधानसभेत भाजपचे १०७ आमदार होते. सत्ता टिकवण्यासाठी भाजपला यातील २८ पैकी किमान ८ जागा जिंकणे आवश्यक होते. तर काँग्रेसकडे सध्या एकूण ८७ आमदार होते.