'भाजपचं उत्पन्न वर्षभरात 50 टक्क्यांनी वाढलं, तुमचं कितीनं ?'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 07:13 PM2021-08-28T19:13:48+5:302021-08-28T19:14:54+5:30
भारतीय जनता पक्षाच्या मिळकतीमध्ये 50 टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र, याचा फायदा सर्वसामान्य जनतेला किती?, असा प्रश्न राहुल यांनी आपल्या ट्विटरवरुन विचारला आहे
नवी दिल्ली - काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सातत्याने भाजपवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर शरसंधान साधत आहेत. दोन दिवसांपूर्वीच केंद्र सरकारवर राष्ट्रीय मालमत्ता विकल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर, आता भारतीय जनता पक्षाच्या संपत्तीत गेल्या वर्षभरात झालेली वाढ सांगत त्यांनी सर्वसामान्य जनतेला प्रश्न विचारला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या मिळकतीमध्ये 50 टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र, याचा फायदा सर्वसामान्य जनतेला किती?, असा प्रश्न राहुल यांनी आपल्या ट्विटरवरुन विचारला आहे. राहुल गांधींनी हे ट्विट करताना एका बातमीचा फोटोही शेअर केला आहे. त्यामध्ये, एडीआरच्या रिपोर्टनुसार 2019-20 मध्ये भाजपच्या इन्कममध्ये 50 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यापैकी, बहुतांश निधी हा निवडणूक फंड म्हणून जमा झाला आहे. भाजपाने आपली एकूण कमाई 3623.28 कोटी रुपये सांगितली आहे.
दरम्यान, विनीत पुनिया यांनीही ट्विट करुन भाजपवर निशाणा साधला आहे. कोरोना कालावधीत देशातील नागरिकांचे उत्पन्न कमी झाले आहे. पहिल्या लाटेत एकूण 23 कोटी नागरिक दारिद्र रेषेखाली आले आहेत. मात्र, भाजप आणि त्यांच्या नेत्यांच्या उत्पनात मोठी वाढ झाली आहे.
अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्यावर टीका
'देशात कोविडची परिस्थिती "चिंताजनक" होत असताना आणि लसीकरणाची गती मंद असताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन राष्ट्रीय विमुद्रीकरण पाइपलाइनची घोषणा करण्यात व्यस्त आहेत,'असा आरोप राहुल गांधींनी केला होता. "कोविडची वाढती संख्या चिंताजनक आहे. पुढच्या लाटेत गंभीर परिणाम टाळण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवला पाहिजे. पण, भारत सरकार विक्रीत व्यस्त असल्यानं कृपया आपली काळजी घ्या.", असे ट्विट त्यांनी केलं होतं.