नवी दिल्ली – केंद्रातील सत्ताधारी पक्ष भारतीय जनता पार्टीचं(BJP) आर्थिक उत्पन्न आणि खर्च दोन्हीमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे. सन २०१९-२० च्या वार्षिक रिपोर्टनुसार भाजपाच्या मागील वर्ष २०१८-१९ मध्ये २ हजार ४१० कोटी उत्पन्नाच्या तुलनेत ५० टक्के नफ्यासह ३ हजार ६२३ कोटी उत्पन्न झालं आहे. परंतु पक्षाचा खर्च सरासरी उत्पन्नापेक्षा खूप जास्त आहे.
निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार, भाजपाने २०१९-२० या आर्थिक वर्षात १ हजार ६५१ कोटी रुपये खर्च केलेत. मागील वर्षी हाच आकडा १ हजार ५ कोटी इतका होता. या एका वर्षात भाजपाचा खर्च जवळपास ६४ टक्क्यांनी वाढला. निवडणूक आयोगानं केलेल्या वार्षिक अहवालानुसार, भाजपाला २०१९-२० या आर्थिक वर्षात इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून २ हजार ५५५ कोटी रुपये उत्पन्न मिळालं आहे. २०१८-१९ मध्ये हेच उत्पन्न १ हजार ४५० कोटी रुपये होतं. पक्षाने निवडणुकीवर अनुक्रमे १ हजार ३५२ कोटी आणि ७९२ कोटी रुपये खर्च केले.
भाजपाने मागील वर्षीच्या तुलनेत काँग्रेसपेक्षा ५.३ पटीनं जास्त कमाई केली आहे. काँग्रेस(Congress) पक्षाला २०१९-२० मध्ये ६८२ कोटी उत्पन्न झालं आहे. त्याचवर्षी भाजपानं काँग्रेसच्या एकूण ९९८ कोटी खर्चाच्या तुलनेत १.६ पटीनं खर्च केला आहे. विशेष म्हणजे भाजपाने मागील आर्थिक वर्षात काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, एनसीपी(NCP), बीएसपी, सीपीएम, सीपीआयच्या एकूण उत्पन्नापेक्षा तीन पटीने जास्त कमाई केली आहे. हे सर्व राष्ट्रीय पक्ष आहेत.
भाजपाचं उत्पन्न ५० टक्क्यांनी वाढलं आहे तर काँग्रेसचं २५ टक्के घटलं आहे. भाजपाला २ हजार ५५५ कोटी इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून मिळाले आहेत तर ८४४ कोटी अन्य माध्यमातून मिळाले आहेत. पक्षाने सांगितल्यानुसार २९१ कोटी वैयक्तिक देणगी, २३८ कोटी कंपन्यांकडून, २८१ कोटी संस्थांकडून तर ३३ कोटी इतर माध्यमातून मिळाले आहेत. पक्षाने विविध संघटनांकडून ५ कोटी रुपये आणि मिटिंगमधून ३४ लाख मिळाले आहेत. पक्ष उमेदवारी अर्जातून भाजपाला २८ लाख, डेलिगेट फिस १.३ कोटी तर सदस्यता शुल्कातून २०.१ कोटी उत्पन्न मिळाले आहे.
भाजपानं पैसे कुठे खर्च केले?
भाजपानं आर्थिक वर्षात २०१९-२० मध्ये जाहिरातींवर ४०० कोटी खर्च केले. जे मागील वर्षीच्या तुलनेत २९९ कोटी जास्त आहेत. पक्षाने इलेक्ट्रॉनिक मीडियाला २४९ कोटी, प्रिंट मीडिया ४७.७ कोटी दिले. २०१८-१९ मध्ये अनुक्रमे १७१.३ कोटी तर २०.३ कोटीपेक्षा ही जास्त रक्कम आहे. भाजपाने त्यांचे नेते आणि उमेदावारांच्या हवाई प्रवासासाठी २५०.५० कोटी खर्च केले. जो १ वर्षापूर्व अवघा २०.६३ कोटी इतका होता. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुका असल्याने हा खर्च वाढला.