शीलेश शर्मा -
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापत चालले असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेतृत्वाने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना मैदानात उतरवले आहे.भाजप सूत्रांनुसार, इराणी यांना त्यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना अडवण्यासाठी राज्यातील महिला मतदारांमध्ये पक्षाला बळकट करण्याची जबाबदारी दिली गेली आहे. स्मृती इराणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘चाय पर चर्चा’च्या धर्तीवर ‘चना -चमेंने’वर संवादाची मोहीम अमेठीत सुरूही केली आहे. महिलांचे छोटे छोटे गट बनवून इराणी या महिलांना सरकारने केलेल्या कामांची माहिती देतील.
भाजपवर नाराजी :२०१७ मधील निवडणुकीत भाजपला मोठ्या संख्येने महिलांनी मतदान केले होते. आता मात्र वाढत्या महागाईमुळे महिला मतदार भाजपवर चांगल्याच नाराज असून त्यांचा कल काँग्रेसकडे दिसतोय. राज्यातील महिला मतदारांचा विश्वास कमावण्यासाठी भाजपचे नेतृत्व मोदी सरकारमधील मंत्री अनुप्रिया पटेल यांनाही मैदानात उतरवण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले.